लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सोने-चांदीच्या दागिन्यांची घडणावळ तसेच हिरे निर्यातीत कार्यरत असलेल्या अंधेरीमधील सीप्झस्थित यश ज्वेलर्स या कंपनीने स्टेट बँकेला ४०५ कोटी ५८ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उजेडात आली असून, याप्रकरणी कंपनीच्या तीन संचालकांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. स्टेट बँकेच्या उप-सरव्यवस्थापकाने केलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे सीबीआयने हा गुन्हा नोंदवला आहे.
\विशेष म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रमोद गोएंका २०१८ पासून बेपत्ता आहेत. त्यांचा मुलगा यशवर्धन गोएंका याने तशी तक्रार देखील पोलिसांत केलेली आहे. याखेरीज, रुस्तुम टाटा व अनंत प्रभुदेसाई हे देखील याप्रकरणी आरोपी आहेत. व्यवसाय विस्तारासाठी यश ज्वेलर्स या कंपनीच्या संचालकांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून २३५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, ज्या कारणासाठी कर्ज देण्यात आले त्या कारणासाठी वापर करण्याऐवजी कंपनीने ते पैसे विविध मार्गांनी अन्य कंपन्यांत तसेच परदेशात वळविल्याचे दिसून आले. या कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे हे कर्ज आणि त्यावरील व्याज असा ४०५ कोटी रुपयांचा फटका स्टेट बँकेला बसला आहे. यानंतर, कंपनीचे कर्ज खाते सर्वप्रथम थकीत कर्ज खाते म्हणून घोषित करण्यात आले. मात्र, कंपनीने मोठा आर्थिक घोटाळा केला असल्याची उघड झाली.