Join us

४०५ किमी रेल्वेमार्गावर ‘कवच प्रणाली’ सज्ज;  ‘प. रे.’चे अपघातविरहित प्रवासाचे उद्दिष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 10:10 AM

रेल्वेचे अपघातविरहित प्रवासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणालीची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे आता सांगितले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :पश्चिम रेल्वेच्या  ७८९ पैकी ४०५ किमी मार्गावर आणि ९० पैकी ६० लोकोवर कवच प्रणालीचे काम आतापर्यंत पूर्ण झाले असून, २०२५ पर्यंत हे सर्व उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. रेल्वेचे अपघातविरहित प्रवासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणालीची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे आता सांगितले जात आहे.

या कवच प्रणालीची रचना गाड्यांची गती २०० किमी प्रतितासपर्यंत वाढविण्यासाठी करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे ट्रेन योग्य वेगाने धावू शकतील. तसेच लोको पायलटना सिग्नलचा धोका टाळण्यासाठी आणि वेगाचे सतत निरीक्षण करण्यासाठी निर्देश देत राहील. सिग्नल आणि वेग यासंबंधीची प्रत्येक माहिती लोको पायलटला दाखविली जाईल. पश्चिम रेल्वेमार्गावर सध्या ९० लोकोसह ७८९ किमीवर या आर्मर सिस्टमचे काम केले जात आहे. त्यातील एकूण ७८९ किमीपैकी ४०५ किमी मार्गावर लोकोच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या. पश्चिम रेल्वेने २०२५ पर्यंत ७३५ किमीवर ही कवच प्रणाली सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

कशी होणार सुरक्षा?

भारतीय रेल्वेने रिसर्च डिझाईन आणि स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनद्वारे स्वदेशी तंत्रज्ञानाने ही प्रणाली विकसित केली आहे. यामध्ये लोको पायलट काही कारणाने ट्रेन नियंत्रित करू शकले नाही, तर ‘कवच’ विशिष्ट वेग मर्यादेत आपोआप ब्रेक लावण्यास साह्यभूत ठरेल. तसेच खराब हवामानात ट्रेन सुरक्षितपणे चालविण्यासदेखील या प्रणालीची मदत होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कुठे पूर्ण झाले काम?

 विरार-सुरत-वडोदरा दरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग विभागाच्या ३३६ पैकी २०१ किमी, तसेच वडोदरा-अहमदाबाद दरम्यान ९६ किमी मार्गावर कवच प्रणालीचे काम पूर्ण झाले आहे.वडोदरा-रतलाम-नागदा दरम्यान नॉन-ऑटोमॅटिक सिग्नलिंग विभागात ३०३ पैकी १०८ किमी मार्गावरही हे काम पूर्ण झाले आहे. येथे अंतिम चाचणी तसेच प्रणाली सुरू करण्याचे कामही प्रगतिपथावर आहे.  

टॅग्स :पश्चिम रेल्वे