मुंबई : आॅगस्टच्या पहिल्या चार दिवसांतच स्वाइन फ्लूचे तब्बल ४१ नवे रुग्ण आढळले आहेत. मंगळवार, ४ आॅगस्टला एकाच दिवशी स्वाइनचे १४ नवे रुग्ण आढळलेत, तर कल्याणच्या एका महिलेचा स्वाइनमुळे मृत्यू झाला. जुलै महिन्यात स्वाइनच्या रुग्णांची संख्या वाढली होती. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या ४ दिवसांत रुग्णांच्या संख्येचा आलेख चढताच आहे. कल्याण येथे राहणाऱ्या ३०वर्षीय महिलेला स्वाइनमुळे केईएम रुग्णालयात जीव गमवावा लागला आहे. या महिलेला स्वाइनची लक्षणे दिसून आल्याने ३१ जुलैपासूनच टॅमिफ्लू देण्यास सुरुवात केली होती. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे १ आॅगस्टला तिला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वाइनमुळे तिच्या श्वसन यंत्रणेवर परिणाम झाला होता. उपचारादरम्यान त्या महिलेचा ३ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला. लेप्टोचा एक नवीन रुग्ण मुंबईत आढळून आला आहे. २०१५मध्ये स्वाइनचे आत्तापर्यंत एकूण ८४ रुग्ण आढळून आले आहेत. स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे. फ्लूप्रमाणेच ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे ही लक्षणे असल्यामुळे अनेक रुग्ण दुर्लक्ष करतात. यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणे आवश्यक आहे. स्वाइनचे लवकर निदान झाल्यास उपचार सुरू झाल्यावर गुंतागुंत वाढत नाही. यामुळेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
चार दिवसांत आढळले स्वाइनचे ४१ रुग्ण
By admin | Published: August 05, 2015 1:55 AM