मनोहर कुंभेजकरमुंबई : पावसाळ्यात मासेमारीला बंदी असते. मात्र, बंदी काळात बेकायदा मासेमारी सुरू असल्याने मत्स्य व्यवसाय विभागाने रायगड जिल्ह्यातील करंजा येथील ४१ बोटींवर कारवाई केली. तसेच सात बोट मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले. मासळीची वाहतूक करणाऱ्या ७२ वाहनांवर आरटीओअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत ही माहिती मिळाली, असे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते.
बेकायदा मासेमारी सुरू असल्याचे कळताच अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीकडून प्रथम कार्यवाहीचे पत्र सरकारला २० जून रोजी दिले. त्यानंतर राज्यातील सर्व संस्थांकडून बेकायदा मासेमारी थांबविण्याचे विनंती पत्र देण्यात आले. यात ठाणे जिल्हा मच्छीमार संघाने पुढाकार घेत बेकायदा मासेमारी रोखण्यासाठी सरकारला दखल घेण्याची विनंती केली. वर्सोवा आणि सातपाटी येथील मच्छीमार सहकारी संस्थांनी पुढाकार घेत संयुक्त सभेचे नियोजन करून विषयाला आक्रमक स्वरूप दिले. महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या पुढाकाराने मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याबरोबर २८ जूनला तातडीची बैठक घेत मंत्र्यांनी बेकायदा मासेमारी करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते.
कारवाईनंतरही मासेमारी सुरूचएवढी मोठी कारवाई होऊनही करंजाच्या मच्छीमारांनी पुन्हा बेकायदा मासेमारी करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. यामुळे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या कार्यकारिणीने पुढाकार घेत मत्स्य व्यवसाय आयुक्त डॉ. अतुल पटणे यांची भेट घेतली. बेकायदा मासेमारी करणाऱ्या बोटी जप्त करून महसूल विभागाकडे सुपूर्द केल्या आहेत. या बोटीही तोडून टाकण्याची विनंती आयुक्तांनी मान्य केल्याचे तांडेल यांनी सांगितले.