Join us

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 41 बिबटे, दोन वर्षांत संख्या वाढली; 27 बिबट्यांचे प्रथमच 'दर्शन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 2:45 AM

मुंबई : बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपिंग परीक्षणात, बिबट्यांची संख्या वाढली असल्याचा अहवाल मंगळवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सादर करण्यात आला. या अहवालानुसार, २0१५ साली कॅमेरा ट्रॅपिंग परीक्षणात ३५ बिबटे आढळून आले होते, तर २0१७ साली करण्यात आलेल्या परीक्षणात बिबट्यांची संख्या ४१ नोंदविण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१४0 किमी परिसराची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपिंग परीक्षणात, बिबट्यांची संख्या वाढली असल्याचा अहवाल मंगळवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सादर करण्यात आला. या अहवालानुसार, २0१५ साली कॅमेरा ट्रॅपिंग परीक्षणात ३५ बिबटे आढळून आले होते, तर २0१७ साली करण्यात आलेल्या परीक्षणात बिबट्यांची संख्या ४१ नोंदविण्यात आली आहे. ४१ बिबट्यांमध्ये १५ नर आणि २३ मादींचा समावेश असून, ३ बिबट्यांचे लिंग ओळखता आले नाही. विशेषत: २७ बिबटे प्रथमच छायाचित्रात दिसून आले आहेत.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह आसपासच्या आरे मिल्क कॉलनी, आयआयटी-पवई, घोडबंदर गाव, नागला ब्लॉक या परिसराची निवड अभ्यासासाठी करण्यात आली. या वेळी जवळपास १४0 किलोमीटर क्षेत्रात अभ्यास करण्यात आला. कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये २ भाग करण्यात आले होते. त्यात पहिल्या भागात २४ कॅमेरा ट्रॅप आणि दुसर्‍या भागात २५ कॅमेरा ट्रॅप करण्यात आले होते. दोन्ही जागेवर २२ दिवस कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे परीक्षण सुरू होते. २0१५ सालच्या डेटाबेस तुलनेत २0१७ साली बिबट्यांची संख्या वाढल्याचे दिसते, परंतु ही वाढ लक्षणीय नाही, असे वन्यजीव संशोधकांचे म्हणणे आहे. 

- 2015 मध्ये जे ३५ बिबटे आढळून आले होते. त्यातील २१ बिबट्यांची छायाचित्रे या वेळच्या कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये मिळू शकली नाहीत. नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू किंवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान सोडून, बाहेरच्या क्षेत्रात बिबट्यांचा संचार होत असल्यामुळे ही छायाचित्रे प्राप्त झालेली नाहीत, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

- बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली असली तरी ती लक्षणीय नाही. मागच्या २ वर्षांच्या पूर्वी कॅमेरा ट्रॅपिंग प्रणाली अद्यावत नव्हती. मात्र, आता संपूर्ण प्रणाली अद्यावत करण्यात आली आहे. त्यामुळे जास्त बिबटे कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये आढळून  आले, असे वन्यजीव संशोधक निकीत सुर्वे यांनी सांगितले.

- वनविभागाकडे बिबट्यांच्या आकडेवारीचा डेटा २ वर्षांचा आहे. २0१५ साली कॅमेरा ट्रॅप अल्प प्रमाणात लावला होता. २0१७ साली कॅमेरा ट्रॅपिंगची संख्या वाढविली. मात्र, तरीही बिबट्यांची संख्या निश्‍चितच वाढत आहे, हे नाकारता येणार नाही, असे बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनसंरक्षक व संचालक अन्वर अहमद यांनी सांगितले.

टॅग्स :बिबट्यामुंबई