४१ टक्के लोकांची घरे एक कोटी रुपयांची
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 12:52 PM2024-08-04T12:52:46+5:302024-08-04T12:53:19+5:30
८४ टक्के घरांची विक्री ही अनुक्रमे दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या शहरांत झाली आहे. हैदराबाद येथे सहा महिन्यांत एक हजार ३०० घरांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे, पुण्यात आलिशान घर खरेदीचाही जोर वाढल्याचे दिसत आहे.
मुंबई : एकीकडे गृहविक्री क्षेत्रात तेजी निर्माण झालेली असतानाच आतापर्यंत झालेल्या घरांच्या विक्रीमध्ये ४१ टक्के घरे ही एक कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किमतीची असल्याची माहिती बांधकाम क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या एका कंपनीच्या सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे. अर्थव्यवस्थेतील सकारात्मक घडामोडी आणि घरांची वाढती मागणी यामुळे प्रामुख्याने आलिशान घरांना मागणी वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत ही वाढ ११ टक्के अधिक आहे.
८४ टक्के घरांची विक्री ही अनुक्रमे दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या शहरांत झाली आहे. हैदराबाद येथे सहा महिन्यांत एक हजार ३०० घरांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे, पुण्यात आलिशान घर खरेदीचाही जोर वाढल्याचे दिसत आहे.
गेल्यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीत पुण्यात २०० आलिशान घरांची विक्री झाली होती. यंदाच्या वर्षीच्या सहा महिन्यांत यात तब्बल ४५० टक्के वाढ होत एक हजार १०० घरांच्या विक्रीची नोंद झाली आहे.
मुंबईकरांची पसंती कुठे?
- आलिशान घरांच्या विक्रीमध्ये दक्षिण मुंबईने आपला वरचष्मा कायम राखला असून गेल्या सहा महिन्यांत झालेल्या आलिशान विक्रीमध्ये एकट्या दक्षिण मुंबईत ३७ टक्के घरांची विक्री झाली आहे.
- दक्षिण मुंबई वगळता ग्राहकांनी दुसरी पसंती वरळीला दिल्याचे दिसून आले आहे. तर, लोअर परळ, प्रभादेवी वांद्रे, जुहू, ओशिवरा, अंधेरी आणि गोरेगाव येथे आलिशान घरांच्या खरेदीला ग्राहकांनी पसंती दिल्याचे दिसून आले आहे. उपनगरात सर्वाधिक ८८१ कोटी रुपयांचे व्यवहार हे गोरेगाव येथे झाले आहेत.
सरकारच्या महसुलातही वाढ
- जानेवारी ते जुलै या सहा महिन्यांत मुंबईत एकूण ८४ हजार ६५३ मालमत्तांची विक्री झाली आहे.
- राज्य सरकारला त्यातून सहा हजार ९२९ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. गेल्यावर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत ही वाढ १६ टक्के वाढ झाली आहे.
विक्रमी उलाढाल
- मुंबई झालेल्या आलिशान घरांच्या विक्रीत विक्रमी आर्थिक उलाढाल झाली आहे. या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये मुंबई शहरात १२ हजार ३०० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
- या घरांचे किमान आकार दोन हजार चौरस फूट आणि त्यापेक्षा अधिक आहे. १२ हजार ३०० कोटींपैकी तीन हजार ५०० कोटींची घरे ही रिसेलमधील आहेत, तर उर्वरित घरे ही नव्याने खरेदी करण्यात आली आहेत.
८,५०० आलिशान घरांची जानेवारी ते जून या सहा महिन्यांत देशातील प्रमुख शहरांत विक्री झाली आहे.
६,७०० गेल्यावर्षी याच कालावधीत घरांची विक्री झाली होती.