जव्हार : जव्हार तालुक्याची जवळपास २ लाख लोकसंख्या आहे. यामध्ये ४ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३१ उपकेंद्र आहेत. त्यामधील ४१ पदे रिक्त असल्याने आदिवासींची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तसेच तालुक्यातील एकाही अरोग्य केंद्रामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञ नसल्याने त्यांची नेमणूक करण्याची जनतेची मागणी आहे.जव्हार तालुक्यात साकूर, जामसर, नांदगाव, साखरशेत अशी चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तर ३१ उपकेंदे्र आहेत. या संपूर्ण तालुक्यातील आरोग्य केंद्रामधील अनेक महत्वाची पदे रिक्त असल्याने उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागते. नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये श्रेणी- अ चे वैद्यकीय अधिकारी नाही तर झाप आणि दाभेरी येथेही श्रेणी-ब चे वैद्यकीय अधिकारी नसल्याने आदिवासींना तालुक्याला जावे लागते. तालुक्यातील आरोग्यकेंद्र व उपकेंद्रामध्ये विदारक स्थिती असून विस्तार अधिकारी - १, आरोग्य सहाय्यक (पुरूष) २, आरोग्य सहाय्यक (महिला) ३, आरोग्य सेवकांची १० पदे रिक्त आहेत. तसेच औषध निर्माण अधिकारी-१, वाहनचालक -६, सफाई कामगार-६ पदे रिक्त आहेत.आरोग्य केंद्रामधील सफाई कामगारपदे कंत्राटी पद्धतीने भरली आहेत. तसेच रिक्त पदांविषयी वरिष्ठ पातळीवर वारंवार पाठपुरावा केला असल्याचे प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दुसाने यांनी सांगिले.
जव्हार तालुक्यातील आरोग्य विभागाची ४१ पदे रिक्त
By admin | Published: January 04, 2015 11:36 PM