Join us  

४१ वर्षांच्या तरुणाचे अवयवदान, पाच रुग्णांना नवीन आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2023 6:41 AM

या अवयवदानातून  फुफ्फुस, किडन्या, यकृत आणि हृदयदान केले गेले. हे मुंबई शहरातील या वर्षातील १५ वे अवयवदान आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :  पेडर रोड  येथील जसलोक रुग्णालयात गुरुवारी ४१ वर्षांच्या तरुणाचा  मेंदूमृत झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यामुळे अवयवांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पाच रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. या अवयवदानातून  फुफ्फुस, किडन्या, यकृत आणि हृदयदान केले गेले. हे मुंबई शहरातील या वर्षातील १५ वे अवयवदान आहे.

२७ एप्रिलला या तरुणाला ब्रेन हॅमरेज (मेंदूमध्ये रक्तस्त्राव होणे) झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यास व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र मेंदूतील सूज काही कमी होत नव्हती, त्यानंतर मात्र डॉक्टरांनी त्या रुग्णाला मेंदूमृत म्हणून घोषित केले. त्यावर त्यांच्या नातेवाइकांना त्याच्या आरोग्यबद्दल कळविण्यात आले. त्यावेळी त्यांनी अवयवदान करण्याची संमती दिली.

या मेंदूमृत व्यक्ती केलेल्या अवयवदानामुळे त्याची एक किडनी जसलोक रुग्णालयातील २३ वर्षाच्या रुग्णाला  देण्यात आली, तर दुसरी किडनी नायर रुग्णालयातील २५ वर्षांच्या रुग्णाला  देण्यात आली. लिव्हर जसलोक रुग्णालयातील ६९ वर्षांच्या व्यक्तीला देण्यात आले. हृदय नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयातील ३९ वर्षांच्या रुग्णाला देण्यात आले तर फुफ्फुस एच एन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयातील ५९ वर्षाच्या व्यक्तीला देण्यात आले. अवयवांचे वाटप  विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीची नियमाप्रमाणे करण्यात आले.

 याप्रकरणी, जसलोक रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. मिलिंद खडके यांनी सांगितले की , “ मी या ४१ वर्षांच्या तरुणांच्या नातेवाइकांना धन्यवाद देतो की, त्यांनी या दुःखाच्या अवस्थेत अवयदानासारखा मोठा निर्णय घेतला. मृत्यू पश्चात जगण्याचा यापेक्षा कोणताही चांगला मार्ग नाही. अवयवदानाच्या जनजागृतीसाठी आणखी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण एक मेंदूमृत व्यक्ती ८ रुग्णांना जीवनदान देतो.”