४१ वर्षीय प्राध्यापिका नफ्याच्या अमिषात फसली, ६० लाख गोठविण्यात सायबर विभागाला यश 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 01:14 PM2024-03-03T13:14:59+5:302024-03-03T13:15:23+5:30

त्याचबरोबर त्यांच्या बँक खात्यातील ६० लाख ३४ हजार रुपयेही गोठवण्यात सायबर विभागाला यश आले आहे. 

41-year-old professor lured by profit, Cyber department succeeds in freezing 60 lakhs | ४१ वर्षीय प्राध्यापिका नफ्याच्या अमिषात फसली, ६० लाख गोठविण्यात सायबर विभागाला यश 

४१ वर्षीय प्राध्यापिका नफ्याच्या अमिषात फसली, ६० लाख गोठविण्यात सायबर विभागाला यश 


मुंबई : शेअर मार्केटमध्ये जास्त नफा मिळवून देण्याच्या आमिषाने अंधेरीतील ४१ वर्षीय प्राध्यापिकेची फसवणूक करणाऱ्या अरबाज अहमद शकील अहमद शेख आणि सराफुद्दीन आयुब शेख ऊर्फ सॅम यांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर त्यांच्या बँक खात्यातील ६० लाख ३४ हजार रुपयेही गोठवण्यात सायबर विभागाला यश आले आहे. 

साक्षी अग्रवाल नावाच्या महिलेने १२ डिसेंबर रोजी तक्रारदारास 
शेअर मार्केटमध्ये अधिकचा नफा मिळवून देते, असे आमिष दाखवले. त्यांच्याशी ‘व्हाॅट्सॲप’ व ‘टेलिग्राम’वर संपर्क साधून लिंक शेअर करून त्यांना ‘वेल प्रो ॲप’ डाऊनलोड करण्यास भाग पाडले. शेअर मार्केटमध्ये सात लाख ३५ हजार रुपये गुंतवणूक करायला लावून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी त्यांनी ओशिवरा पोलिसात तक्रार दिल्यानंतर ३ फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला. 

परिमंडळ ९ चे पोलिस उपायुक्त राज तिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी भांडवलकर आणि सायबर पथकातील पोलिस उपनिरीक्षक शरद देवरे, हवालदार अशोक कोंडे आणि शिपाई विक्रम सरनोबत यांनी तपास सुरू केला. तसेच हे पैसे ज्या बँकांमध्ये जमा झालेले त्या बँकांचे व्यवस्थापक व नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधत तसेच ई-मेलद्वारे पत्रव्यवहार करून ६०.३५ लाख रुपयांची रक्कम गोठवण्यात आली.

 असे शोधले आरोपी ! 
-   पोलिसांनी मोबाइल क्रमांकाचे विश्लेषण  केल्यावर एका बँकेचा खातेधारक नवी मुंबईच्या खारघरमध्ये असल्याचे आढळले. 
-   खातेधारक अरबाज अहमद शकील अहमद शेख आणि त्याचा सहकारी सराफुद्दीन आयुब शेख ऊर्फ सॅम याला अटक केली.

वीस हजारांत खाते!
-   सॅम हा लोकांचे वेगवेगळ्या बँकेमध्ये खाते उघडून त्यांना प्रत्येक खात्यामागे २० हजार रुपये द्यायचा. 
-   त्यानंतर त्या खात्याची माहिती त्याचे दिल्ली, अजमेर, राजस्थान व उत्तर  प्रदेशस्थित सायबर गुन्ह्यातील इतर साथीदारांना पुरवत होता. 
-   ‘टेलिग्राम’च्या व ‘व्हॉट्सॲप’च्या माध्यमातून लोकांशी संपर्क करून त्यांना शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांची ‘वेल प्रो’ ॲपद्वारे फसवणूक करत असे.
 

Web Title: 41-year-old professor lured by profit, Cyber department succeeds in freezing 60 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.