महापालिकेचे ४२ कर्मचारी, तर ६६ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 01:24 AM2020-07-29T01:24:51+5:302020-07-29T01:24:59+5:30
अँटिजन चाचणी : कोरोनाशी लढा देताना होतोय संसर्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून महापालिकेचे आरोग्य, सफाई तसेच इतर कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्या २४ जुलैपासून अँटिजेन टेस्ट पालिकेकडून केल्या जात आहेत. सोमवारी पालिकेचे १७, तर पोलीस विभागातील ३५ कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत अँटिजेन टेस्टमध्ये पालिकेचे ४२, तर पोलीस विभागातील ६६ कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करताना, मुंबईत स्वच्छता ठेवताना, मुंबईकरांना पाणीपुरवठा करताना, अन्नवाटप करताना पालिकेच्या २ हजार ६८६ पालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. तर १०८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पालिका कर्मचाºयांना कोरोनाची लागण होत असल्याने त्यांच्या टेस्ट करण्याची मागणी केली जात होती. महापालिकेच्या ज्या विभागात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे अशा विभागातील पालिका आणि पोलीस कर्मचाºयांच्या अँटिजन टेस्ट केल्या जात आहेत.
२४ जुलै रोजी पालिका कर्मचाºयांच्या २ हजार ४४३ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १६ कर्मचारी पॉझिटिव्ह, तर २ हजार ४३२ कर्मचारी निगेटिव्ह आले होते. शनिवार, रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी २७ जुलैला २ हजार १८० पालिका कर्मचाºयांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये २ हजार १६३ निगेटिव्ह आले आहेत, तर १७ कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एक लक्षण असलेला तर १६ लक्षणे नसलेले कर्मचारी आहेत. मुंबई महापालिकेकडून आतापर्यंत ५ हजार ८५९ कर्मचाºयांच्या टेस्ट करण्यात आल्या. त्यात ५ हजार ८१७ कर्मचारी निगेटिव्ह, तर ४२ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ४१ पॉझिटिव्हपैकी एक लक्षणे असलेला तर ४१ लक्षणे नसलेले कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. तर ५ हजार ८१७ निगेटिव्ह असलेले कर्मचारी आहेत.
कोरोना झालेल्या रुग्णांवर उपचार करताना, मुंबईत स्वच्छता ठेवताना, मुंबईकरांना पाणीपुरवठा करताना, अन्नवाटप करताना २ हजार ६८६ पालिका कर्मचाºयांना लागण झाली़
लक्षणे नसलेले आढळले पॉझिटिव्ह रुग्ण
पलिकेच्या डी विभागात ५, एफ नॉर्थ विभागात ३, के वेस्ट विभागात ५, पी नॉर्थ विभागात ५, आर साऊथ विभागात ९, आर सेंट्रल विभागात १, आर नॉर्थ विभागात ४, एस विभागात ९ असे एकूण ४१ रुग्ण लक्षणेविरहित पॉझिटिव्ह रुग्ण आले आहे. तर आर सेंट्रल या विभागात एकच लक्षणे असलेला रुग्ण आढळून आला आहे. आतापर्यंत पोलीस विभागातील २४ जुलैला १५२५ कर्मचाºयांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३१ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आले होते. शनिवार-रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी १२१६ पोलिसांच्या चाचण्या करण्यात आल्या, त्यात ३५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. दोन दिवसात २७४१ पोलिसांच्या चाचण्या करण्यात आल्या, त्यात ६६ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.