Join us

वांद्रेत ४२ टक्के मतदान

By admin | Published: April 12, 2015 2:30 AM

शनिवारी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये ५८.७४, तर मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथे ४२ टक्के मतदान झाले.

मुंबई : शनिवारी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये ५८.७४, तर मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथे ४२ टक्के मतदान झाले. दोन्ही मतदारसंघांत बुधवारी १५ एप्रिलला मतमोजणी होईल. दोन्ही मतदारसंघांत गेल्या वेळेपेक्षा मतदानाची टक्केवारी घटली. माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते नारायण राणे मैदानात उतरल्याने वांद्रे (पूर्व) येथील निवडणूक चुरशीची झाली. शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत व ‘एमआयएम’चे रहेबर खान हेही भवितव्य अजमावीत आहेत. शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे.नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार नीलेश आणि आमदार नितेश राणे यांना शनिवारी खेरवाडी व वाकोला पोलिसांनी काही तासांसाठी स्थानबद्ध केले होते. त्यावर आक्षेप घेत नारायण राणे यांनी शिवसेना सत्तेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे सेनेचे खासदार विनायक राऊत यांना बीकेसी पोलिसांनी एक तास पोलीस ठाण्यात बसवले होते. त्यांना मतदारसंघात न फिरण्याची समज दिली. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत असलेल्या तासगाव-कवठेमहांकाळमध्ये त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत. त्यांना भाजपाचे बंडखोर स्वप्नील पाटील यांच्यासह आठ अपक्षांनी आव्हान दिले आहे. मात्र येथील लढत एकतर्फी मानली जात आहे.