Join us

निवडणूक कामासाठी ४२ हजार कर्मचारी; लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 11:31 AM

लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने तब्बल ४२ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

मुंबई :मुंबई उपनगरातील ४ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने तब्बल ४२ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सोमवारपासून सुरुवात झाली असून १५ एप्रिलपर्यंत विविध विधानसभा मतदारसंघात प्रशिक्षणे सुरू राहणार आहेत. मुंबईमधील मतदारसंघांतील मतदानाला दीड महिन्याहून अधिक काळ असला तरी निवडणूक आयोगाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू झाली आहे.

१) मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण २६ विधानसभा मतदारसंघ आहे. 

२) दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातील अनुशक्तीनगर आणि चेंबूर हे दोन विधानसभा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात मोडतात. 

२६ ठिकाणी प्रशिक्षण घेतले जाणार -

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघ असल्याने निवडणूक विभागाकडून नियोजन आखण्यात आले.एकूण ७,३५३ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे ४२ हजार मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. त्यांचे तीन टप्प्यात प्रशिक्षण घेतले जाणार असून पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण १ एप्रिलपासून सुरु झाले आहे. त्यामध्ये केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्ष आणि इतर मतदान अधिकारी यांच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे. 

यात ईव्हीएमचा वापर, निवडणुकीचे नियम, कायदे आणि कार्यपद्धती यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण दिवसाचे असेल. मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ ठिकाणी हे प्रशिक्षण घेतले जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

निवडणूक कामाला दांडी मारणाऱ्यांवर गुन्हे-

कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. या प्रशिक्षणाला उपस्थित न राहणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. नोटिशीला समाधानकारक उत्तर न दिल्यास संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४भारतीय निवडणूक आयोग