जेएसडब्लूची कोकणात ४२०० कोटींची गुंतवणूक - सामंत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 06:37 AM2022-09-23T06:37:05+5:302022-09-23T06:38:01+5:30
पेण येथे ९६० मेगावॅटचा पीएसपी प्रकल्प
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांची पहिली पसंती असून, जेएसडब्लू कोकणामध्ये सुमारे ४२०० कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यातील पेण येथील जेएसडब्लू निओ एनर्जी प्रकल्पाच्या सामंजस्य करारासंदर्भात गुरुवारी मंत्रालयात बैठक पार पडली. त्या वेळी सामंत बोलत होते.
जेएसडब्लूच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून ४५० तरुणांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार असून मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे रोजगार निर्माण होणार आहे. तरुणांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभाग काम करीत असल्याचे सामंत यांनी या वेळी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणारे आपले सरकार आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यामध्ये ७५ हजार तरूणांना रोजगार देण्याचा मानस असून त्याअनुषंगाने उद्योग विभाग कार्य करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीला प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन व इतर उपस्थित होते.