Join us

कोरोनाचे ४२३ रुग्ण, मुंबईसह राज्यासाठी धोक्याची घंटा; आतापर्यंत मुंबईत १८ बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 2:19 AM

मागील काही तासांत कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत आहे, तर दुसऱ्या बाजूला बळींची संख्याही वाढते आहे.

मुंबई : जगभरातील अन्य देशांप्रमाणेच आता राज्यातही कोरोनाची दहशत वाढते आहे. राज्यात गुरुवारी ८८ नव्या कोरोनारुग्णांचे निदान झाले. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या ४२३ वर पोहोचली आहे. तर मुंबईतील स्थितीही दिवसागणिक गंभीर होत असून गुरुवारी ५४ कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील बळींची संख्या २१ वर पोहोचली आहे. यात एकट्या मुंबईतील बळींची संख्या १८ आहे.

मागील काही तासांत कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत आहे, तर दुसऱ्या बाजूला बळींची संख्याही वाढते आहे. परिणामी, राज्यासाठी ही धोक्याची घंटा असून आता तरी सामान्यांनी सामाजिक अंतर राखले पाहिजे

झोपडपट्टी परिसरातही कोरोनाचा शिरकाव

मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाºया धारावीतही कोरोनाने शिरकाव केला आहे. गुरुवारी धारावीच्या ५६ वर्षीय रु ग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याला कोणताही प्रवासाचा इतिहास नव्हता. त्याच्या कुटुंबातील सात जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांची चाचणी करण्यात येणार आहे.

‘राज्यात कोरोनामुळे एकूण २१ बळी गेले आहेत. दिल्ली येथील धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या मुंबईतील नागरिकांची संख्या १२७ इतकी आहे. त्यातील १०५ जणांना पालिकेच्या आरोग्य विभागाने क्वारंटाइन केले आहे. तर अन्य नागरिकांचा शोध सुरू असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

वरळी कोळीवाड्यात १२ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३ जण संशयित रुग्ण आहेत, तर १७६ जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

‘लॉकडाऊन’चे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध सक्तीची कारवाई

सरकारी आदेश न पाळल्याबद्दल भारतीय दंड विधान व आपत्ती व्यवस्थापन कायदा यानुसार होऊ शकणाºया शिक्षेची लोकांना व्यापक प्रमाणावर माहिती करून द्या व ‘लॉकडाऊन’चे उल्लंघन करणाºयांविरुद्ध त्यानुसार कडक कारवाई करण्यास सुरुवात करा.- अजय भल्ला, केंद्रीय गृहसचिव (राज्यांना पाठविलेल्या पत्रात) या पार्श्वभूमीवर शहर-उपनगरातील कोरोनाबाधित रुग्ण सापडलेले सुमारे १९४ विभाग पालिका प्रशासनाने सील केले आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबई