सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासासाठी टाटा, अदानींसह ४३ कंपन्या इच्छुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 01:02 PM2020-09-26T13:02:01+5:302020-09-26T13:05:25+5:30
मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे ऐतिहासिक स्थान असून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्येही त्याचा समावेश आहे.
मुंबई - CSMT प्रकल्पाच्या लिलावपूर्व बैठकीचे अध्यक्षस्थान, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि रेल्वे मंडळाचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी डिजिटल माध्यमातून आज भूषविले. रेल्वेमंडळाच्या पायाभूत सेवा विभागाचे सदस्य, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक तसेच उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनीही या बैठकीत उपस्थिती लावली. भारतभरातील रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास हा भारतीय रेल्वेचा एक प्रमुख कार्यक्रम आहे. सरकारमार्फत पूर्ण ताकदीनिशी हा कार्यक्रम राबवला जात असून PPP म्हणजे खासगी सार्वजनिक भागीदारीच्या माध्यमातून खासगी उद्योजकांचाही सहभाग यात घेतला जात आहे. आज झालेल्या लिलावपूर्व बैठकीला उद्योगजगताकडून उदंड प्रतिसाद मिळाला तसेच विकासक आणि निधीसंस्था यांना गुंतवणुकीच्या दृष्टीने यात मोठे स्वारस्य असल्याचे दिसून आले.
या बैठकीत लिलावाची बोली लावू शकणारे 43 संभाव्य बिडर्स सहभागी झाले. यात अदानी समूह, टाटा प्रोजेक्ट्स लि., एल्देको, GMR समूह, एस्सेल समूह, लार्सन अँड टुब्रो इत्यादींचा, तर वास्तुविशारदांपैकी BDP सिंगापूर, हाफिज कॉन्ट्रॅक्टर आदींचा, निधी संस्थांपैकी ऍन्करेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग, ब्रूकफील्ड यांचा तर सल्लागार कंपन्यांपैकी JLL, बोस्टन कन्सल्टन्सी समूह, केपीएमजी इत्यांदींचा तर दूतावासांपैकी ब्रिटिश उच्चायुक्तांचा समावेश होता.
मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे ऐतिहासिक स्थान असून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्येही त्याचा समावेश आहे. भारताच्या माननीय पंतप्रधानांच्या दूरदृष्टीनुसार CSMT ला बहुविध प्रकारच्या वाहतुकीचे केंद्र बनवण्याच्या दृष्टीने या रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे काम होणार असून यात वाहतुकीच्या विविध प्रकारांचे एकात्मीकरण अपेक्षित आहे. यात आगमन आणि प्रस्थानाच्या जागांचे अलगीकरण, दिव्यांगस्नेही स्थानकाची निर्मिती, प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सुविधा, ऊर्जासक्षम इमारत आणि सन 1930 प्रमाणे या वारसा इमारतीचे पुनरुज्जीवन अशा मुद्द्यांचा समावेश आहे. CSMT रेल्वे स्थानक शहरातील रेल्वे मॉलप्रमाणे कार्यान्वित केले जाणार असून यात प्रवासाच्या गरजांबरोबरच अन्य दैनंदिन गरजांच्या पूर्ततेचीही काळजी घेतली जाणार आहे- जसे- किरकोळ दुकाने, खाद्य-पेये, करमणूक, विशेष वस्तूंची खरेदी वगैरे. प्रवाशाच्या बहुतांश दैनंदिन गरजा रेल्वेस्थानकातच भागवून, शहरातील त्यांचा अनावश्यक प्रवास टाळण्याचा हेतू यात ठेवण्यात आला आहे.
पुनर्विकास झाल्यानंतर या स्थानकातील पायाभूत सुविधा अशा असतील, ज्यांच्या योगे प्रवासाच्या एका वाहतूक प्रकारातून दुसऱ्या वाहतूक प्रकारात विना-अडथळा जात येईल. पुनर्विकासानंतर प्रवाशांना सहज ये-जा करता येण्यासाठी अनेक ठिकाणी सोय केलेली असेल. तसेच उपनगरी रेल्वे, हार्बर रेल्वे, लांब पल्ल्याच्या गाड्या, मेट्रो रेल्वे, इत्यादी बाबींमध्ये थेट जोडणी असणार आहे. यामुळे गर्दी टाळण्यास मदत होण्याबरोबरच वारसा इमारतीच्या स्थापकतेतील सौंदर्याचा आस्वाद घेता येणेही शक्य होईल.
20.08.2020 रोजी प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार IRSDC ने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या पुनर्विकासासाठी PPP पद्धतीने RFQ म्हणजे पात्रता विनंती अर्ज मागवले आहेत. RFQ प्रपत्र पुढील लिंक वर मिळू शकेल-http://irsdc.enivida.com/. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22.10.2020 अशी आहे.
लिलावपूर्व बैठकीत असेही स्पष्ट करण्यात आले कि, RFQ टप्प्यावर अर्जदाराला केवळ आर्थिक निकषांची पूर्तता करावी लागेल.
सदर CSMT प्रकल्पाचा खर्च 1642 कोटी रुपये इतका तर बांधकाम खर्च 1433 कोटी रुपये इतका अपेक्षित आहे. या बांधकामासाठी 4 वर्षे लागण्याची शक्यता आहे. RFP टप्प्यावर निवड झालेल्या बिडरने पुनर्विकास आणि सभोवारच्या रेल्वे जमिनीचा व्यापारी विकास यासाठी रेल्वेजमिनीचे निवडक भूखंड वाणिज्यिक वापरासाठी 60 वर्षांकरिता तर निवासी वापरासाठी 99 वर्षांच्या भाडेतत्त्वावर घ्यावयाचे असतील.