पारा ४३ अंशावर; दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याला पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 07:48 PM2020-04-14T19:48:19+5:302020-04-14T19:49:00+5:30
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई : पुढील चार दिवसांसाठी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्हयांसह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्हयांचा यात समावेश आहे. अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असतानाच दुसरीकडे कमाल तापमानातही कमालीची वाढ झाली आहे. मंगळवारी राज्यात सर्वात जास्त तापमान जळगाव ४३.२ अंश, परभणी ४१.२ आणि नाशिक येथे ४०.१ अंश सेल्सिअस एवढया कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
राज्याचा पारा दिवसागणिक वाढतच असून, जळगाव येथील कमाल तापमान थेट ४३ अंश नोंदविण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंतच्या हंगामातले हे सर्वाधिक तापमान आहे. तर मुंबईचे कमाल तापमान ३५ अंशावर स्थिर असले तरी ऊकाड्यात काही प्रमाणात वाढ झाल्याने मुंबईकर घामाघूम होत आहेत. आता राज्याच्या कमाल तापमानात दिवसेंदिवस वाढच होणार असून, अवेळी कोसळणारा पाऊस नागरिकांना अधिकच तापदायक ठरणार आहे. येत्या काळात कमाल तापमानात आणखी वाढ होईल; आणि विशेषत: गुजरातसह दक्षिण भारताला कमाल तापमानाचे चटके अधिक बसतील. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच कमाल तापमानाचा पारा वाढू लागला आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यात उन्हाळा आणखी तापदायक असणार आहे. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाची नोंद ४० अंश होईल. राज्यात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ०.५ ते १ अंशाने अधिक नोंदविण्यात येईल. किमान तापमानात सरासरी ०.५ ते १ अंश एवढी वाढ नोंदविण्यात येईल. पूर्व पश्चिम राजस्थान, पश्चिम मध्यप्रदेश, गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर दक्षिण कर्नाटक आणि लगतच्या परिसरात कमाल तापमानात अधिकची वाढ नोंदविण्यात येईल. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तरप्रदेश, झारखंडमध्ये हीच परिस्थिती राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
-------------------------
- जागतिक तापमान वाढीमुळे उष्ण वर्षांच्या नोंदीत भरच पडत असतानाच दुसरीकडे देशभरात सर्वसाधारण मान्सूनच्या तुलनेत १० टक्के अधिक मान्सूनची नोंद होऊनही देशभरातील २५ टक्के भागाने दुष्काळाच्या झळा सोसल्या आहेत.
- १९९८ सालापासून जागतिक पातळीवर नोंदविलेल्या उष्ण वर्षांपैकी २०१६ नंतर २०१९ हे आता दुसरे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरल्याची नोंद करण्यात आली असतानाच १९८० सालापासून २०१८ पर्यंत म्हणजे ३९ वर्षांपैकी २२ वर्षांत आलेल्या उष्णतेच्या लाटेच्या तुलनेत थंडीच्या लाटेने अधिक बळी घेतले आहेत.
- ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्ण वर्षांच्या नोंदीत भरच पडत असून, १९९८ सालापासून जागतिक पातळीवर नोंदविलेल्या उष्ण वर्षांपैकी २०१६ नंतर २०१९ हे आता दुसरे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरल्याची नोंद नॅशनल ओशिएन अँड अॅटमॉसफेरिक अॅडमिनिस्टेÑशनच्या नॅशनल सेंटर्स फॉर एन्व्हायर्नमेंटल इन्फॉर्मेशनने केली होती.