आँनलाईन व्यवहारांमध्ये वाढ
मुंबई : कोरोना संकटामुळे ४३ टक्के भारतीयांचे ‘आमदनी’ घटली असून त्यांना आपल्या त्यांना भवितव्याबद्दलची चिंता आहे. आर्थिक चणचण कमी करण्यासाठी अनावश्यक खर्चाला कात्री लावणे, मासिक खर्चाची पुनर्रचना करणे, आपत्कालीन परिस्थितीसाठी पैसे सुरक्षित ठेवण्याला प्राधान्य दिले जात असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
एस्पिरियन या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेने जगभरातील प्रातिनिधीक ग्राहक आणि रिटेल, बँक आणि ई काँमर्स क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रतिनिधींशी चर्चा करून एक अहवाल तयार केला आहे. त्यात ग्राहकांची बदललेली मानसिकता आणि कार्यपध्दतीचा आढावा घेण्यात आला आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात आँनलाईन प्लँटफाँर्मचा वापर लक्षणीयरित्या वाढला आहे. आँनलाईन माध्यमे (४६ टक्के) ओटीटी (४२ टक्के), आणि किराणा सामानाची आँनलाईन खरेदी (४२ टक्के) यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पुढील वर्षभरात त्यात आणखी वाढ होईल असे मत ५० टक्के भारतीयांनी व्यक्त केले आहे. डिजीटल बँकींगमध्ये १६ तर मोबाईल वाँलेटच्या वापरात १४ टक्के वाढ झाली आहे. तर, आँनलाईन अकाऊंट उघडे आणि क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याचे प्रमाण जवळपास ५० टक्क्यांनी वाढले आहे. आँनलाईन पेमेंटचे प्रमाण वाढल्यामुळे इंटरनेट, केबल, क्रेडिट कार्ड, मोबाईल फोनची बिले भरण्यात अडचणी येत असल्याचे ३३ टक्के लोकांचे म्हणणे आहे. तर, आँनलाईन व्यवहारांमध्ये फसवणूक होईल, क्रेडिट कार्डची माहिती लिक होईल, वैयक्तिक माहितीचा गैरवापर होईल अशी भीती ४२ टक्के भारतीयांना वाटत आहे. कोरोनामुळे देशातील प्रत्येक व्यक्तीला आणि व्यावसायिकांना आपला प्राधान्यक्रम बदलावा लागला आहे. सुरक्षित वाटत असलेले परंपरागत कार्यपध्दती बाजूला सारून डिजीटल व्यवहारांचा स्वीकार करावाच लागेल. परंतु, तो वापर सुरक्षित हवा असे मत मत एक्स्पिरीयाचे भारतातील प्रमुख सत्या कल्याणसुंदरम यांनी व्यक्त केले आहे.
परंपरागत व्यवसाय पध्दतीत बदल
ग्राहकांच्या आर्थिक कोंडीचा विपरित परिणाम टाळण्यासाठी व्यवसायिकांना आपल्या परंपरागत पध्दतींमध्ये बदल करावा लागत आहे. ५३ टक्के व्यावसायिकांना ग्राहकांचे आरोग्य आणि आर्थिक स्थिरतेबाबत काळजी असल्याचेही या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. या व्यवहारांमधिल फसवणूक टाळण्यासाठी ४७ टक्के व्यावसायिकांचे प्राधान्य असेल तर ६१ टक्के लोकांनी आपला व्यवसाय वाढविण्यात स्वारस्य आहे. त्यासाठी अतिरिक्त खर्च करण्याची ८४ टक्के व्यावयाकियांची तयारी असून ८१ टक्के जणांना आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापरही सुरू केला आहे.