४३ लाख शेतीपंप वीज ग्राहकांची बिले तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:06 AM2021-02-18T04:06:42+5:302021-02-18T04:06:42+5:30
कृषी वीजबिल सवलत याेजनेंतर्गत कार्यवाही लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सरकारने कृषी पंप वीज जोडणी धोरण २०२० व त्या ...
कृषी वीजबिल सवलत याेजनेंतर्गत कार्यवाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सरकारने कृषी पंप वीज जोडणी धोरण २०२० व त्या अंतर्गत कृषी वीजबिल सवलत योजना जाहीर केली आहे. ही योजना राबविताना ४३ लाख शेतीपंप वीज ग्राहकांची थकीत वीजबिले तपासली जातील. तसेच चुकीची वीजबिले दुरुस्त करण्यात येतील. प्रलंबित वीज जोडण्याही त्वरित देण्यात येतील. त्यासाठी आवश्यकतेनुसार सौरपंप व वीज जोडण्यांचे उद्दिष्ट वाढविण्यात येईल. शेतकरी ग्राहकांना दिवसा वीज देण्याची योजना ३ वर्षांत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिल्याची माहिती वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी दिली.
महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन यांनी नितीन राऊत यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी या विषयावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील ८० टक्क्यांहून अधिक शेतीपंपांची वीजबिले सरासरीने दुप्पट किंवा अधिक आलेली आहेत. विनामीटर शेतीपंपांचा जोडभार वाढवला आहे. मीटर असलेल्या व मीटर चालू नसलेल्या शेतीपंपांचे वीजबिल मीटर रिडींग न घेता, सरासरी १०० ते १२५ युनिट्स म्हणजे दुप्पट किंवा अधिक आकारले जात आहे. मीटर बंद असलेले लाखो ग्राहक आहेत. त्यांच्याकडून सरासरी १०० ते १२५ युनिट्सची आकारणी होत आहे. या पद्धतीने वाढलेली बिले दुरुस्त करण्यासाठी जेथे विनामीटर जोडणी आहे, तेथे खरा जोडभार तपासून त्यानुसार बिले दुरुस्त करावीत, असे म्हणणे यावेळी मांडण्यात आले.
जेथे मीटर आहेत व ते सुरू आहेत, तेथे प्रत्यक्ष रिडींग घेऊन त्यानुसार बिले दुरुस्त करावीत. मीटर बंद आहेत अशाठिकाणी मागील मीटर चालू कालावधीतील वीज वापर गृहित धरून त्यानुसार संपूर्ण कालावधीचा वीजवापर व त्यानुसार बिले दुरुस्त करावीत. जेथे मीटर पूर्ण काळ बंद आहेत व प्रत्यक्ष वीजवापर तपासता येत नाही, अशाठिकाणी त्या फिडरवरुन दिलेली वीज व त्या फिडरवरील खरा जोडभार याआधारे सरासरी वीजवापर व त्यानुसार बिले निश्चित करावीत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत, असे होगाडे यांनी सांगितले.