४३ लाख मुंबईकरांनी केली नियमांची एैशी की तैशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 01:05 PM2023-08-19T13:05:45+5:302023-08-19T13:07:21+5:30

तीन लाख ई-चलन केवळ वाहतुकीला अडथळा आणला, या एका नियमासाठी जारी करण्यात आले आहेत.

43 lakh mumbaikars break rto rules | ४३ लाख मुंबईकरांनी केली नियमांची एैशी की तैशी

४३ लाख मुंबईकरांनी केली नियमांची एैशी की तैशी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ४३ लाख वाहनधारकांचे मुंबई महानगर बेशिस्तीचे आगर बनत असून, गेल्या साडेचार महिन्यांत वाहतुकीच्या विविध नियमांचा भंग केल्याबद्दल ६ लाख ८२ हजार ई-चलान बजावले गेले आहेत. यापैकी तीन लाख ई-चलन केवळ वाहतुकीला अडथळा आणला, या एका नियमासाठी जारी करण्यात आले आहेत.

रस्त्यांच्या दुतर्फा नियमबाह्य पद्धतीने वाहने उभी करणे, रस्त्यात वाहन बंद पडणे यासह फेरीवाल्यांमुळे अडथळे निर्माण होऊन वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडणे आदींसाठी वाहतुकीत अडथळा आणल्याबद्दल वाहतूक पोलिस कारवाई करतात. मुंबईतील वाहतूक समस्या पाहता, अधिकाधिक वाहनधारक हे बिनदिक्कतपणे आपापली सोय पाहत असल्याचे यातून सिद्ध होते. 

शहरात सुरू असलेली विविध विकासकामे, बांधकामे यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. बाजारात खरेदीसाठी आलेले लोक जागा मिळेल तिथे वाहन उभे करून यात अधिकची भर घालत असतात. नादुरुस्त आणि जुनी वाहने रस्त्यात बंद पडण्यामुळे वाहतुकीचा खोळंबा करत असतात. लेनची शिस्त न पाळणे, एकेरी वाहतूक मार्गात विरुद्ध दिशेने वाहन चालवून वाहतुकीचा खोळंबा करणे आदी सर्व गोष्टींची गंभीर दखल घेतली जात असून,  वाहन चालकांनी नियम पाळावेत अन्यथा आणखी कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सात महिन्यांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन जास्त झाले आहे. या सात महिन्यांत सीट बेल्ट न लावता वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे, जादा भाडे आकारणे यासारख्या गुन्ह्यांसाठी वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या ई-चलानांची संख्या मागील वर्षाच्या आकडेवारीपेक्षा जास्त आहे.

५०० रुपये दंड 

वाहतुकीला अडथळा आणणे या पहिल्या गुन्ह्यासाठी ५०० रुपये दंड आकारला जातो. हाच गुन्हा पुन्हा पुन्हा केल्यास प्रत्येक वेळी १५०० रुपये दंड आकारला जातो.

वाहन चालकांनी वाहतूक नियम उल्लंघन केल्यास त्यांच्यावर ई-चलान आकारले जाते. ई-चलान वेळेत न भरल्यास कोर्टात खटला दाखल करून कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाते. काही गंभीर गुन्ह्यांमध्ये आरटीओकडे परवाना निलंबन किंवा रद्द करण्याची शिफारस केली जाते. वाहन चालकांनी नियम पाळावेत, अन्यथा आणखी कठोर कारवाई केली जाईल. -एम. रामकुमार, अपर पोलिस आयुक्त (वाहतूक)
 

Web Title: 43 lakh mumbaikars break rto rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.