मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, मुंबई महापालिकेतील ४३ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. पालिकेच्या २४५ माध्यमिक शाळांमधून एकूण १७,१४० एवढे विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी १४,५२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, पालिका शाळांचा सरासरी निकाल ८४.७७ टक्के इतका लागला आहे. पालिकेची मुले हुशार म्हणत, ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेले पालिकेचे ५० विद्यार्थी आहेत.
मार्च २०२२पेक्षा यंदाच्या पालिका शाळांच्या निकालात यंदा घट दिसून आली आहे. मार्च २०२२मध्ये कोरोनानंतर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून पूर्वीच्या नियमावलीप्रमाणे म्हणजेच १०० टक्के अभ्यासक्रम, तीन तासांचा वेळ याप्रमाणे परीक्षा घेतली. दरम्यान, दहावीच्या परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे महानगरपालिका शाळेतील पहिल्या २५ विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील पाच वर्षांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी किमान रुपये २५ हजार आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे.
मिशन - ३५ पुस्तिकेची निर्मिती मुंबई महापालिका शिक्षण विभागाने प्रत्येक विद्यार्थ्याला किमान ३५ गुण मिळतील यासाठी सोप्या व मोजक्या आशयाची निर्मिती करून मिशन-३५ पुस्तिकेची निर्मिती केली.विद्यार्थ्याचा सराव होण्यासाठी डिसेंबर २०२२ पासून एकूण दहा सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या. अधिकाऱ्यांना सर्व शाळा दत्तक देऊन शाळांना मार्गदर्शन केले. शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजनही केले. विद्यार्थी, शिक्षक, पालक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षणीय यंत्रणा यांच्यामध्ये समन्वय राखला. ज्याठिकाणी शिक्षकांची कमतरता होती तिथे तासिका तत्त्वावर शिक्षकांची नेमणूक केली.
पालिकेच्या गुंदवली एम.पी.एस. शाळेमधील शुभम सिंग या विद्यार्थाने ९५.२० टक्के गुण मिळवून मनपाच्या सर्व शाळांमधून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.