Join us

म्‍युकरमायकोसिसवर वेळेवर उपचारांमुळे ४३ वर्षीय मधुमेही व्‍यक्‍तीला मिळाले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाने पीडित रुग्‍णांसह कमकुवत रोगप्रतिकारशक्‍ती असलेल्‍या इतर अनेक लोकांना म्‍युकरमायकोसिस या आजाराचा धाेका वाढत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाने पीडित रुग्‍णांसह कमकुवत रोगप्रतिकारशक्‍ती असलेल्‍या इतर अनेक लोकांना म्‍युकरमायकोसिस या आजाराचा धाेका वाढत असल्याचे निदर्शनाला आले आहे. मात्र, म्‍युकरमायकोसिसवर वेळेवर उपचार केल्यामुळे ४३ वर्षीय मधुमेही व्‍यक्‍तीला जीवनदान मिळाले.

मधुमेह असलेल्या ४३ वर्षीय शिक्षकाला डिसेंबर २०२०मध्‍ये दुर्मीळ आजाराचा त्रास जाणवू लागला, त्यांना मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांना दाखविण्‍यात आले. बायोप्‍सी व हिस्‍टोपॅथोलॉजिकल अहवालामधून जलदपणे वाढत चाललेला आजार म्‍युकरमायकोसिस असल्याचे निदान झाले. या आजारावर वेळेत उपचार मिळाल्याने ते बरे झाले.

ईएनटी स्‍पेशालिस्‍ट डॉ. संजय हेलाले म्‍हणाले की, प्रथम रुग्‍णावर बायलॅटरल इथमॉईड व स्‍फेनॉइड्सचे सायनस कापून टाकण्‍यासह डाव्‍या बाजूस मॅक्झिलेक्‍टोमी क्रिया करण्‍यात आली. त्‍यानंतर शस्‍त्रक्रियेच्‍या तिसऱ्या दिवशी डॉ. प्रतीक छेडा यांनी रुग्‍णाला तात्‍पुरती खोट्या दातांची कवळी बसवली. एक महिन्‍यानंतर सीईसीटी आणि एमआरआय करण्‍यात आले. यामधून निदर्शनास आले की, शस्‍त्रक्रिया करताना डाव्‍या मॅक्सिलावर कोणत्‍याही प्रकारची रेडिओपॅक जखम नाही आणि हिस्‍टोपॅथोलॉजिकल अहवालामधून कोणताच आजार नाही. तीन महिन्‍यांनंतर रुग्‍णाचे पुन्‍हा सीईसीटी व एमआरआय करण्‍यात आले आणि स्‍कॅनमधून कोणतीही जखम नसल्‍याचे आढळून आले. टीम त्‍याचा नैसर्गिक आवाज पुन्‍हा आणण्‍यामध्‍ये यशस्‍वी ठरली. ऑब्‍टूरेटरशिवाय ते नाकातून बोलू लागले. आता ते पूर्णपणे बरे झाले असून, त्यांचा नैसर्गिक आवाज पूर्ववत झाल्याने अध्यापनाचे कामही ते करत आहेत.

या रुग्णाच्‍या बाबतीत आम्‍हाला त्‍वरित उपचार करावे लागले अन्‍यथा त्‍याला त्‍याचे प्रमुख अवयव गमवावे लागले असते. आमच्‍यासाठी त्‍याचे जीवन वाचवणे महत्त्वाचे होते. त्या व्यक्तीला बरे करण्यासाठी काम केलेल्‍या टीमचा मला खूप अभिमान वाटतो, असे मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलच्‍या इन्‍फेक्शियस डिसीज स्‍पेशालिस्‍ट डॉ. अनिता मॅथ्‍यू म्‍हणाल्‍या.

* १० लाख व्‍यक्‍तींपैकी एकामध्ये आढळताे आजार

हेड ॲण्‍ड नेक ऑन्‍को सर्जरीचे सल्‍लागार डॉ. हितेश सिंघवी म्‍हणाले की, म्‍युकरमायकोसिस हा आजार १० लाख व्‍यक्‍तींपैकी एकामध्‍ये आढळून येतो. या आजारामुळे आंधळेपणा, अवयवांमध्‍ये बिघाड, शरिरातील उती कमी होणे, असा त्रास होण्‍यासोबत वेळेवर उपचार न केल्‍यास मृत्‍यूही ओढवतो. या आजारामध्‍ये मृत्‍यूचे प्रमाण ६० टक्‍के इतके जास्त आहे. अशा केसेसमध्‍ये शस्‍त्रक्रिया हा प्रमाणित केअर उपचार आहे.

...................................................