लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने २ ते १७ सप्टेंबरदरम्यान जादा ४३०० बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकांतून २ सप्टेंबरपासून या जादा बस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी ३५०० बस सोडण्यात आल्या होत्या. यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये ८०० बसची वाढ करण्यात आली आहे.
महामंडळातर्फे व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्येही अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकीट दरात सवलत आहे. आरक्षण npublic.msrtcors.com या संकेतस्थळासह एमएसआरटीसी बस रिझर्व्हेशन ॲप आणि बसस्थानकामध्येही होणार आहे.
वाहन दुरुस्ती पथकही तैनात करणार
एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथकही तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे प्रसाधानगृहही उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती महामंडळातर्फे देण्यात आली.