Join us

नवरात्रात सरकारने कमावले ४३५ कोटी; मुंबईत ४५९४ मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 10:15 AM

त्या तुलनेत यंदा खरेदी-विक्री व्यवहारांत ३७ टक्के वाढ झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा असलेल्या मुंबईत बांधकाम क्षेत्राने आता चांगला वेग पकडला आहे. नुकत्याच पार पडलेल्या नवरात्रात मुंबईत तब्बल ४५९४ मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार पार पडले. त्यातून राज्य सरकारच्या तिजोरीत घसघशीत ४३५ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला, तोही अवघ्या नऊ दिवसांत. गेल्या वर्षी हेच प्रमाण ३३४३ मालमत्तांच्या नोंदणीचे होते. त्या तुलनेत यंदा खरेदी-विक्री व्यवहारांत ३७ टक्के वाढ झाली आहे. 

बांधकाम उद्योगातील अग्रगण्य संशोधन संस्था असलेल्या नाईट फ्रँक कंपनीने यासंदर्भात अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार, नवरात्रीच्या नऊ दिवसांत दिवसाकाठी ५१० मालमत्तांच्या नोंदणीचे व्यवहार झाले आहेत. यंदा १५ ऑक्टोबरला घटस्थापना झाली. त्याआधीच्या १४ दिवसांत दिवसाकाठी २३१ मालमत्तांची नोंदणी झाली होती. त्या कालावधीमध्ये पितृपक्ष असल्याने नोंदणी घटली होती. मात्र नवरात्रीच्या मुहूर्तावर अनेकांनी नव्या मालमत्तांची नोंदणी केल्याचे दिसून आले. नऊ दिवसांत झालेल्या मालमत्तांच्या नोंदणीमध्ये सर्वाधिक प्रमाण हे निवासी मालमत्तांचे आहे. त्या तुलनेत नवे कार्यालय अथवा व्यावसायिक मालमत्तांचे प्रमाण कमी आहे.

चालू वर्षाच्या पहिल्या १० महिन्यांत मुंबईत १ लाख मालमत्तांच्या व्यवहारांची नोंदणी झाली. हा आतापर्यंतचा सर्वोच्चांक मानला जात आहे. गेल्यावर्षी संपूर्ण वर्षात मुंबईत एकूण १ लाख २२ हजार मालमत्तांच्या नोंदणीचे व्यवहार झाले होते. त्या तुलनेत पहिल्या दहा महिन्यांतच मालमत्तेतील व्यवहारांनी उच्चांक गाठला आहे.

 

टॅग्स :मुंबई