मुंबई, ठाणे मेट्रोसाठी 4350 कोटींच्या ट्रेन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 07:45 AM2020-11-24T07:45:54+5:302020-11-24T07:46:22+5:30
८४ ट्रेनच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर; बीईएमएला मिळाले १२ नव्या ट्रेनचे काम
मुंबई : मे, २०२१ मध्ये मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणाऱ्या दहिसर ते डी. एन. नगर (२अ) आणि दहिसर ते अंधेरी (७) या मार्गावर एकूण ९६ ट्रेन धावणार असून त्यांच्या निर्मितीसाठी ४,३५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यापैकी ८४ ट्रेनच्या बांधणीचे काम भारत अर्थ मूव्हर्स लि. (बीईएमएल)मार्फत सुरू असून उर्वरित १२ ट्रेनच्या बांधणीची जबाबदारीसुद्धा त्यांच्यावरच सोपविण्यात आली आहे. या दोन्ही मार्गिका डिसेंबर, २०२० पर्यंत सुरू करण्याचे नियोजन होते. नोव्हेंबर महिन्यात पहिली ट्रेन मुंबईतील चारकोप डेपोत दाखल होईल अशी अपेक्षा होती. मात्र, कोरोना संकट आणि कामांतील विलंबामुळे मेट्रोची ही धाव लांबणीवर पडली आहे.
१४ जानेवारी, रोजी पहिली ट्रेन मुंबईत दाखल झाल्यानंतर ट्रायल रन सुरू होईल आणि मे महिन्याच्या अखेरीस या मार्गावर प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू होईल. पहिल्या टप्प्यात २० ते २५ मिनिटांच्या अंतराने १० ट्रेन या मार्गावर धावतील, असे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी दोन महिन्यांपूर्वी स्पष्ट केले होते. ती डेडलाइन गाठण्याचे मोठे आव्हान यंत्रणांसमोर उभे ठाकले आहे. या दोन मेट्रो मार्गिकांसाठी ३७८ कोच असलेल्या ६३ ट्रेन उभारणीचे कंत्राट बीईएमएलला नोव्हेंबर, २०१८ मध्ये देण्यात आले होते. त्यानंतर ऑगस्ट, २०१९ मध्ये २१ ट्रेनच्या १२६ कोचसाठी ऑर्डर देण्यात आली. गेल्या आठवड्यात उर्वरित १२ ट्रेन उभारणीसाठी बीईएमएल लघुत्तम निविदाकार ठरल्याने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने हे काम त्यांच्याकडे सोपविले आहे. या तिन्ही टप्प्यातील ट्रेन निर्मितीचा खर्च अनुक्रमे ३०१५ कोटी, ८३४ कोटी आणि ५०१ कोटी इतका आहे.