Join us

लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांतून ४३,५१६ जणांचा विनातिकीट प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 4:05 AM

लोकमत न्युज नेटवर्कमुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांमध्ये गहन, विशेष ...

लोकमत न्युज नेटवर्क

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांमध्ये गहन, विशेष आणि नियमित तिकीट तपासणी करताना ४३,५१६ जण विनातिकीट प्रवास करताना आढळले आहेत. त्यांच्याकडून दीड कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

अनधिकृत प्रवाशांचा गाड्यांमध्ये प्रवास होऊ नये यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत उपनगरी आणि विशेष लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अनियमित प्रवासाविरुद्ध नियमित, गहन आणि विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येते.

वरिष्ठ अधिकारी आणि तिकीट तपासनीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने जून ते २० नोव्हेंबर या कालावधीत केलेल्या गहन, विशेष आणि नियमित तपासणी दरम्यान एकूण ४३,५१६ प्रकरणे आढळून आली आणि दंड म्हणून १.५० कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. ४३,५१६ पैकी उपनगरी गाड्यांमध्ये ३९,५१६ प्रकरणे आढळून आली आहेत तर रु. १.१० कोटी इतका दंड आणि लांब पल्ल्याच्या मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये ४,००० प्रकरणे आढळून आली आहेत व त्यातून रु. ४० लाख इतका दंड वसूल करण्यात आला.

या ४३,५१६ प्रकरणांमध्ये ३६,७५४ प्रकरणे नियमित तिकीट तपासणी मोहिमेमध्ये, ४,६१६ प्रकरणे गहन तिकीट तपासणी मोहिमेमध्ये आणि २,१४६ प्रकरणे विशेष तिकीट तपासणीच्या मोहिमेमध्ये आढळून आली आहेत. दरम्यान, प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.