Join us

४३६ रिंगरूट बस सेवेचे उद्घाटन

By admin | Published: August 02, 2015 10:55 PM


४३६ रिंगरूट बस सेवेचे उद्घाटन
३० हजार नागरिकांना होणार फायदा
दिंडोशी: गोरेगांव (पूर्व) रेल्वे स्थानक ते आयटी पार्क ही बेस्टने २०१२ साली बंद केलेली ४३६ बस आजपासून पुन्हा सुरु झाली आहे. या रिंगरूट बससेवेचे उद्घाटन विभागप्रमुख सुनील प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक सदाशिव पाटील, प्रभाग क्र. ३७ च्या शिवसेना नगरसेविका मनीषा पाटील, शाखाप्रमुख संदीप जाधव, नारायण पाटील, म्हाडाचे शैलेश शेट्ये, प्रा.घन:श्याम सोनार, विनोद वर्दम यांच्यासह म्हाडा आणि नागरी निवारा परिषदेतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभू यांनी या बसचे तिकिट विकत बसचे उद्घाटन केले.
या बसचा फायदा येथील सुमारे ३० हजार नागरिक आणि आयटी पार्कच्या कर्मचार्‍यांना होणार आहे. या बसमुळे येथील नागरिकांच्या वेळेत बचत होणार असून जनरल अरुण कुमार वैद्य मार्गावरील ताण देखील कमी होणार आहे. गोरेगांव (पूर्व) रेल्वे स्थानकावरून सकाळी ६.२५ वाजता पहिली बस तर रात्री १० वाजता शेवटची बस असेल. तर नागरी निवारा परिषद येथून सकाळी ६ वाजता पहिली बस तर रात्री १० वाजून २० मिनिटांनी शेवटची बस असेल. (प्रतिनिधी)