मुंबई : इराणमध्ये अडकलेल्या ४४ भारतीय प्रवाशांना इराण एअरच्या विमानाने शुक्रवारी दुपारी मुंबईत आणण्यात आले. त्यांच्यामध्ये सध्या कोरोनाची कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळली नसून सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांना १४ दिवसांसाठी घाटकोपर येथील नौदलाच्या विलगीकरण कक्षात निरीक्षणासाठी ठेवण्यात आले आहे.
इराण एअरवेजच्या आयआर ८१० या तेहरान येथून आलेल्या विमानातून या प्रवाशांना मुंबईत आणण्यात आले. विमानातील प्रवासी व केबिन क्रू यांची आयसोलेशन बेमध्ये एपीएचओद्वारे तपासणी करण्यात आली. मुंबईत परतल्यानंतर या प्रवाशांना घाटकोपर येथील नौदलाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. येथे अशा संशयित रुग्णांना निरीक्षणाखाली ठेवण्याकरिता १०० आसनांची व्यवस्था आहे. तेथे या ४४ संशयित रुग्णांना ठेवण्यात आले आहे. यापैकी ज्यांना त्रास होणार नाही व कोरोनाची लक्षणे आढळणार नाहीत त्यांना १४ दिवसांच्या कालावधीनंतर घरी सोडण्यात येईल. तर, ज्यांना त्रास होईल किंवा लक्षणे आढळतील त्यांना अधिक उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात येईल, अशी माहिती नौदलाचे जनसंपर्क अधिकारी कमांडर मेहुल कर्णिक यांनी दिली. इराणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून, तेथे ६ हजारांपेक्षा अधिक भारतीय नागरिक अडकले आहेत, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले होते. मंगळवारी ५८ जणांना भारतात आणण्यात आले.