नोव्हेंबर महिन्यात मुंबईतून केला ४४ लाख लोकांनी विमान प्रवास
By मनोज गडनीस | Updated: December 11, 2023 19:46 IST2023-12-11T19:45:49+5:302023-12-11T19:46:08+5:30
११ नोव्हेंबरला एका दिवसात तब्बल १०३२ विमानांची आवक-जावक

नोव्हेंबर महिन्यात मुंबईतून केला ४४ लाख लोकांनी विमान प्रवास
मुंबई - नोव्हेंबर महिन्यात मुंबईविमानतळाने प्रवासी संख्येचा नवा विक्रम रचला असून या महिन्यात मुंबई विमानतळावरून तब्बल ४४ लाख ६० हजार लोकांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत यंदा प्रवासी संख्येत १३ टक्के वाढ नोंदली गेली आहे.
विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात केवळ विक्रमी प्रवासी संख्याच नोंदली गेली नाही तर आणखीही दोन विक्रम नोंदले गेले आहेत. यापैकी ११ नोव्हेंबर या दिवशी मुंबई विमानतळावर एका दिवशी १०३२ विमानांची आवक-जावक झाली आहे. दिल्लीनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ असलेल्या मुंबई विमानतळाव रोज ९०० च्या आसपास विमानांची वाहतूक होते. त्याऐवजी १०० अतिरिक्त विमानांची वाहतूक मुंबई विमानतळाने हाताळली आहे.
संपूर्ण महिन्यात मुंबई विमानतळावरून एकूण २८ हजार ६७९ विमानांची वाहतूक झाली.