- स्नेहा मोरेमुंबई : देशात ४४ टक्के डॉक्टर ताण-तणावाचे बळी असल्याची धक्कादायक बाब एका खासगी संस्थेने केलेल्या वैद्यकीय चिकित्सकांच्या आरोग्यविषयक अभ्यासातून समोर आली आहे. यात महिला डॉक्टरांचे प्रमाण सर्वाधिक आहे.भारतीय संस्कृतीत देवदूत मानल्या जाणाऱ्या डॉक्टरांवर गेल्या काही वर्षांत हल्ले आणि गैरवर्तवणुकीचे प्रकार वाढू लागलेत. त्यातच वैद्यकीय क्षेत्रात असणारी जीवघेणी स्पर्धा, व्यावयासिक ताण, कामाचे तास आणि बदललेली जीवनशैली याचा परिणाम डॉक्टरांच्या आरोग्यावरही होताना दिसत आहेत.या अभ्यासाकरिता विविध शाखेतील जवळपास १५ हजारांहून अधिक वैद्यकीय चिकित्सकांविषयी निरीक्षणे नोंदविली आहेत. अभ्यासातील निरीक्षणानुसार, ६१ टक्के महिला डॉक्टर ताण-तणावाच्या बळी आहेत, तर पुरुष डॉक्टरांचे प्रमाण ३९ टक्के आहे. त्यात सर्वाधिक ताण-तणावाखाली असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये युरोलोजिस्ट ५४ टक्के, न्यूरोलोजिस्ट ५३, फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिएशन स्पेशालिस्ट ५२, इंटर्नल मेडिसिन ४९, एमर्जन्सी मेडिसिनतज्ज्ञ ४८, फॅमिली मेडिसिनतज्ज्ञ ४८, डायबेटीस स्पेशालिस्ट ४७, सर्जरी व जनरलतज्ज्ञ ४६ टक्के, गायनाकॉलॉजिस्ट ४५, रेडिओलॉजिस्ट ४५ टक्के यांचा समावेश आहे. तणावाचे सर्वात कमी प्रमाण आय स्पेशालिस्ट, प्लॅस्टिक सर्जन, नेफ्रोलोजिस्ट यांच्यात आढळून आले आहे.ही आहेत कारणे...मानसिक ताणाची कारणे पाहिली असता, त्यात वेगवेगळ्या स्वरूपाची कामे ५९ टक्के, कामाच्या ठिकाणी सर्वाधिक वेळ घालविणे ३४ टक्के, कामावर होणारा अनादर ३० टक्के, वेतन कमी मिळणे २९ टक्के आणि रुग्णांकडून मिळणारी चुकीची वागणूक १६ टक्के ही प्रमुख कारणे आहेत.डॉक्टरसुद्धा माणसे आहेत. त्यांनाही शारीरिक आणि मानसिक आजार होतात. मागील काही वर्षांपासून प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे ताण-तणावाचे व्यवस्थापन केले पाहिजे. नियमित आरोग्य चाचणी करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.- डॉ. नीलेश शहा, मानसोपचार विभागप्रमुख, सायन रुग्णालय
चिंताजनक! देशातले ४४ टक्के डॉक्टर तणावाखाली; महिला डॉक्टरांचं प्रमाण सर्वाधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 5:25 AM