पूरग्रस्तांसाठी राज्यात ४४१ तात्पुरता निवारा केंद्रे; साडेचार लाख लोकांना केलं स्थलांतरित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 01:49 PM2019-08-12T13:49:31+5:302019-08-12T13:50:39+5:30

पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये १०५ बचाव पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

441 temporary shelter centers in the state for flood victims; more than 4 lakh peoples did immigrants | पूरग्रस्तांसाठी राज्यात ४४१ तात्पुरता निवारा केंद्रे; साडेचार लाख लोकांना केलं स्थलांतरित

पूरग्रस्तांसाठी राज्यात ४४१ तात्पुरता निवारा केंद्रे; साडेचार लाख लोकांना केलं स्थलांतरित

googlenewsNext

मुंबई - पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हल‍विण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील पूरग्रस्त भागातील ४ लाख ६६ हजार ९६३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या नागरिकांसाठी ४४१ तात्पुरता निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या ३३ पथकांसह आर्मी, नौदल, तटरक्षक दलाची एकूण १११ बचाव पथके कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी वैद्यकीय सेवा कार्यरत असल्याची माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.

पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये १०५ बचाव पथके कार्यरत करण्यात आली आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ५४ तर सांगली जिल्ह्यात ५१ पथकांचा समावेश आहे. याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नागपूर येथेही बचाव पथके कार्यरत आहेत.

पूरग्रस्त कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील बारा बाधित तालुक्यातील २ लाख ४७ हजार ६७८ तर सांगली शहरासह जिल्ह्यातील चार बाधित तालुक्यातील १ लाख ७३ हजार ८९ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २०८ तर सांगली जिल्ह्यात १०८ तात्पुरता निवारा केंद्र सुरु करण्यात आली आहेत.

पावसामुळे पूरस्थितीत असलेल्या राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये बचाव कार्य जोमाने सुरू आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ११८ गावांमधील ९ हजार ५२१, ठाणे जिल्ह्यामधील सात तालुक्यातील २५ गावांमधील १३ हजार १०४, पुणे जिल्ह्यातील  आठ तालुक्यातील १०८ गावांमधील १३ हजार ५००, नाशिक जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ५ गावांमधील ३ हजार ८९४, पालघर जिल्ह्यातील तीन तालुक्यातील ५८ गावांमधील २ हजार, रत्नागिरी जिल्ह्यातील सात तालुक्यातील १२ गावांमधील ६८७, रायगड जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील ६० गावांमधील ३ हजार, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सात तालुक्यातील १८ गावांमधील ४९० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

पूर परिस्थितीमध्ये कोल्हापूर, सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ७० तालुके बाधीत झाले आहेत. यातील पूरग्रस्त गावांची संख्या ७६१ इतकी आहे. या सर्व ठिकाणी मदत कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.    
 

Web Title: 441 temporary shelter centers in the state for flood victims; more than 4 lakh peoples did immigrants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.