४४३ इमारतींना पावसाळ्यात धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 06:21 AM2020-06-03T06:21:23+5:302020-06-03T06:21:42+5:30
अतिधोकादायक जागा रिकामी करा : दुर्घटना घडल्यास पालिका जबाबदार नाही, प्रशासनाचे स्पष्टीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहरातील तब्बल ४४३ इमारती अतिधोकादायक श्रेणीत असून पालिकेने ती निवासस्थाने तातडीने सोडण्याचे आवाहन रहिवाशांना केले होते. मात्र, त्यानंतरही अनेक इमारतींमध्ये रहिवाशांनी घरे सोडलेली नाहीत. पावसाळ्यात या इमारतींची पडझड होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने मंगळवारी पुन्हा एकदा रहिवाशांना इमारतीतून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. या इमारती कोसळून काही दुर्घटना घडल्यास पालिका जबाबदार राहणार नाही, असेही स्पष्ट केले.
राज्य सरकारच्या आदेशानुसार दरवर्षी पालिका हद्दीतील मोडकळीस आलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करून पालिका त्यांची यादी प्रसिद्ध करते. ज्या इमारतींची दुरुस्ती अशक्य आहे (सी-१ श्रेणी) तिथल्या रहिवाशांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून इमारत पाडणे अभिप्रेत आहे. या रहिवाशांना पर्यायी घरे उपलब्ध नसल्याने त्याच इमारतींमध्ये जीव मुठीत धरून अनेक कुटुंबे वास्तव्य करतात.
यंदा पालिकेची यंत्रणा कोरोनाचा मुकाबला करण्यात व्यस्त असल्याने या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करून अतिधोकादायक इमारतींचे पाडकामही करता आलेले नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने इथल्या रहिवाशांना पुन्हा आवाहन केले आहे. अतिधोकादायक श्रेणीतल्या इमारतींची यादी पालिकेने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार वॉर्डनिहाय सरकारी आणि खासगी मालकीच्या इमारतींची माहिती त्यात आहे.
रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना
इमारतीचे कॉलम, बीम, स्लॅब झुकल्यासारखे दिसत असतील, तळमजल्याचा भाग खचल्यासारखा दिसत असेल, इमारतीच्या कॉलममधील भेगा वाढल्या असतील, काँक्रिट पडत असेल, तर रहिवाशांनी इमारत तातडीने रिकामी करावी.
आसपासच्या रहिवाशांनाही सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात, तातडीने आरसीसी सल्लागाराची नियुक्ती करून इमारतीच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि त्याबाबतची माहिती त्वरित पालिकेच्या आपत्कालीन कक्षाला द्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.
जबाबदार नागरिक म्हणून आपापल्या परिसरातील धोकादायक इमारतींवर लक्ष ठेवल्यास संभाव्य दुर्घटना टाळता येतील, असेही पालिकेने नमूद केले आहे.