कोरोनामुळे ४४४ बालकांनी गमावले पालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:06 AM2021-06-03T04:06:08+5:302021-06-03T04:06:08+5:30
शाेध घेण्याचे काम सुरू; मुंबई उपनगर जिल्ह्यात ३११८ मृतांच्या कुटुंबीयांचे सर्वेक्षण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुळे दोन्ही किंवा ...
शाेध घेण्याचे काम सुरू; मुंबई उपनगर जिल्ह्यात ३११८ मृतांच्या कुटुंबीयांचे सर्वेक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे दोन्ही किंवा एका पालकाचा मृत्यू झालेल्या बालकांच्या योग्य पुनर्वसनासाठी प्रत्येक जिल्ह्यात कृती दलांची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्हा कृती दलाने सर्वेक्षणाच्या माध्यमातून अशा बालकांचा शोध घेण्याचे काम हाती घेतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक पालक गमावलेल्या ४४४ तसेच दोन्ही पालक गमावलेल्या ७ घटना समोर आल्या आहेत.
मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी गठित या कृती दलाची दुसरी बैठक नुकतीच जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत जिल्ह्यात ३,११८ व्यक्ती कोरोनामुळे मृत झाल्या असून, त्यांच्या कुटुंबीयांचे सर्वेक्षण करुन माहिती घेण्याचे काम सुरू आहे. स्थानिक पातळीवर अंगणवाडी सेविका, आशा सेविकांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण केले जावे तसेच पालक गमावलेल्या बालकांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश बोरीकर यांनी यावेळी दिले. वस्ती पातळीवर चौकशी करत असताना, अंगणवाडी सेविकांना काही अडचणी आल्यास तत्काळ मदत उपलब्ध करून देण्याबाबत सर्व स्थानिक पोलीस स्थानकांमध्ये कळविण्यात आले आहे. अशा बालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस स्थानकातील मोबाईल व्हॅनच्या माध्यमातूनही स्थानिक पातळीवर जनजागृती करावी, अशा सूचना देण्यात आल्या. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्व प्रभागनिहाय माहिती संकलित करून ती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला उपलब्ध करून द्यावी. तसेच सर्व बालकांची काळजी घेणाऱ्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.
स्थानिक पातळीवर अंगणवाडी सेविका, आशा सेविकांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यावेळी बाल संरक्षण समितीसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शन पुस्तिकेचे प्रकाशनही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
.....................................