सहा महिन्यांत ४४८० मातांनी केले दूध दान; ९५८ नवजात बालकांना झाला फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2023 09:17 AM2023-08-08T09:17:38+5:302023-08-08T09:17:46+5:30
जागतिक स्तनपान सप्ताह गेल्या आठवडाभरात साजरा करण्यात आला. या काळात स्तनपानाचे महत्त्व आणि फायदे याविषयी जागरूकता आणण्यासाठी या सप्ताहाचे जगभरात आयोजन केले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पहिल्या सहा महिन्यांसाठी बाळाला आईचे दूध म्हणजे अमृत असते. मात्र, काही नवजात बालकांना वैद्यकीय कारणामुळे स्वतःच्या आईचे दूध मिळत नाही. अशा बाळांकरिता ३३ वर्षांपूर्वी आशियामधील पहिली मानवी दूधपेढी सायन रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांत या पेढीत ४४८० मातांनी दूध दान केले असून, त्याचा ९५८ बालकांना फायदा झाला आहे.
जागतिक स्तनपान सप्ताह गेल्या आठवडाभरात साजरा करण्यात आला. या काळात स्तनपानाचे महत्त्व आणि फायदे याविषयी जागरूकता आणण्यासाठी या सप्ताहाचे जगभरात आयोजन केले जाते. स्तनपानाव्यतिरिक्त दिलेल्या दुधामुळे नवजात बालकांना संसर्ग आणि अतिसार होण्याचा धोका असतो. त्यामुळे स्तनपान गरजेचे असते. यातूनच बाळाची रोगप्रतिकारकशक्ती वाढत असते. बाळाला वाढीसाठी सर्व पोषणद्रव्ये आईच्या दुधातूनच मिळत असतात.
कसे संकलित केले जाते दूध?
स्तनपान करणाऱ्या आईकडून त्यांचे अतिरिक्त दूध या पेढीला मिळते. याकरिता रुग्णालयाच्या ओपीडी आणि वॉर्डमध्ये समुपदेशन केले जाते. काही माता यासाठी पुढे येतात. त्या दूध दान करतात. ते दूध घेण्यापूर्वी ती माता आरोग्यदायी आहे याची पूर्ण माहिती घेतली जाते. त्यांना कुठलाही आजार नाही याची काळजी घेतली जाते. मग त्या दुधावर प्रक्रिया केली जाते. ते दूध पाश्चराइज्ड केले जाते. त्यानंतर ते पेढीत ठेवले जाते.
दरवर्षीं हजारो बालकांना या पेढीमधून दूध दिले जाते. दूध संकलित करण्यासाठी सर्व शास्त्रीय प्रक्रिया राबविली जाते. सहा महिन्यांपर्यंत हे दूध या पेढीत साठवून ठेवू शकता येते. मात्र, उपलब्ध असलेले दूध १५ दिवसातच संपते. खासगी रुग्णालयात प्रसूती झालेल्या माताही येथे येतात.
- डॉ. स्वाती मणेरकर, नवजात शिशू विभागप्रमुख, सायन रुग्णालय