Join us

मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 5:43 AM

वरळी मध्ये अदित्य ठाकरें विरोधात मनसेकडून संदीप देशपांडे मैदानात

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ४५ उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये मुंबईतील १८ उमेदवारांचा समावेश आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे अखेर माहीममधून निवडणुकीच्या रिगणात उतरणार आहेत. आ. प्रमोद (राजू) पाटील यांना कल्याण ग्रामीणमधून, तर दिवंगत आ. रमेश वांजळे यांचा मुलगा मयुरेश वांजळे यांना खडकवासलामधून उमेदवारी देण्यात आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा स्वबळावर लढण्याचे घोषित केले होते. उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळीमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मनसेने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. मात्र, अमित ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे उद्धवसेना त्यांच्याविरोधात उमेदवार देणार की नाही हे उद्या कळेल.

नाशिक जिल्ह्यात उमेदवार देण्यात आलेला नाही. गेल्यावेळी मनसेने १०१ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील हे एकमेव आमदार निवडून आले होते. गेल्यावेळच्या तुलनेत यंदा मनसेने जाहीर केलेल्या ४५ उमेदवारांपैकी भांडुप पश्चिम, मागाठाणे, दहिसर, दिंडोशी, कांदिवली (पूर्व), घाटकोपर (पश्चिम), घाटकोपर (पूर्व), चेंबूर, चांदिवली, भिवंडी (पश्चिम), मीरा भाईंदर, हडपसर, गुहागर, कर्जत - जामखेड, वरोरा या १५ मतदारसंघात नवीन उमेदवार दिले आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मनसेराज ठाकरेआदित्य ठाकरेअमित ठाकरेमाहीमवरळीमुंबई विधानसभा निवडणूक