१४ फ्लॅटसाठी ४५ कोटी घेतले; ७ परस्पर विकले; बिल्डर विजय मच्छिंदरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 12:30 PM2024-01-05T12:30:26+5:302024-01-05T12:31:58+5:30
या कंपनीचा संचालक व बिल्डर विजय मच्छिंदर याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी रात्री उशिरा अटक केली.
मुंबई : एका गुंतवणूकदाराला १४ फ्लॅट देण्याच्या मोबदल्यात त्याच्याकडून ४५ कोटी घेऊनही त्यातील सात फ्लॅट परस्पर अन्य लोकांना विकल्याप्रकरणी ऑर्नेट स्पेसेस प्रा.लि. या कंपनीचा संचालक व बिल्डर विजय मच्छिंदर याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी रात्री उशिरा अटक केली.
ऑर्टेन स्पेसेस प्रा.लि. कंपनीने ओशिवरा येथे एक प्रकल्प जाहीर केला. यामध्ये राजेन्द्र सुराणा व त्याच्या नातेवाइकांनी १४ फ्लॅटची खरेदी केली. याकरिता संबंधित विकासकाला ४५ कोटी रुपये दिले होते. हा व्यवहार २०१२ मध्ये झाला होता; मात्र २०२१ पर्यंत सुराणा यांना एकाही फ्लॅटचा ताबा दिला नाही व याकरिता सातत्याने या विकासकाने टाळाटाळ केली होती. दरम्यानच्या काळात विजय मच्छिंदर याने या १४ सदनिकांपैकी ७ सदनिका तिसऱ्याच व्यक्तीला परस्पर विकून टाकल्या. याची माहिती मिळाल्यानंतर सुराणा यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली.
ईडीची कारवाई अशी...
- मच्छिंदर याने काळा चौकी येथील अभ्युदयनगर येथील पुनर्विकासाचे कामही हाती घेतले होते; मात्र तेथील रहिवाशांची देखील त्याने कोट्यवधींची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी देखील मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.
- या दोन्ही प्रकरणांत झालेल्या आर्थिक व्यवहारांत मनी लाँड्रिंग झाल्याचे उघडकीस आल्यानंतर ‘ईडी’ने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. यासंदर्भात त्याला बुधवारी चौकशीसाठी बोलाविण्यात आले व रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली आहे.
दाऊद टोळीशी कनेक्शन?
विजय मच्छिंदर याचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या टोळीशी देखील संबंध असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दाऊद इब्राहिम याचा राइट हँड मानल्या जाणाऱ्या छोटा शकील याचा मेहुणा आरीफ भाईजान याच्यासोबत विजय मच्छिंदर याचे जवळचे संबंध असल्याची माहिती आहे. विजयने त्याच्यासोबत आर्थिक व्यवहार केल्याच्या माहितीचा देखील तपास यंत्रणा तपास करीत आहेत.