Join us  

एनसीबीकडून ४५ लाखांचा ड्रग्जचा साठा जप्त; महाराष्ट्रासह गुजरात व पंजाबमधील टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 7:23 AM

मुंबई, ठाणे व आसपासच्या परिसरात सीबीसीएसच्या बाटल्यांची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.

मुंबई : राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) महाराष्ट्रासह गुजरात आणि पंजाब राज्यात चालणाऱ्या नशेसाठीच्या औषधांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ४५ लाख रुपये किमतीच्या ३,१९५ सीबीसीएसच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी अंकील खोलवडवाला (३३), जगदीशचंद्र खोलवडवाला (६७), गिरधर चातुरी (३७), फकरुद्दीन मोमीन (४०) आणि इम्रान देवकर (४२) या पाच जणांना अटक करत अधिक तपास सुरू केला आहे. 

एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे व आसपासच्या परिसरात सीबीसीएसच्या बाटल्यांची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार एनसीबी मुंबई विभागाचे प्रमुख अमित घावटे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास सुरू केला.  सुरुवातीला भिवंडी येथून इम्रान देवकर पथकाच्या हाती लागला. तो या औषधांच्या बाटल्या खरेदी करून त्या रस्त्यावरील विक्रेत्यांना देत होता. त्याच्या चाैकशीतून एनसीबीने अंकील खोलवडवाला हा सूरतमधून त्याला माल पुरवत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, पथकाने त्यालाही अटक केली. 

अंकील याने फकरुद्दीन मोमीन नावाच्या ट्रान्सपोर्टरच्या माध्यमातून इम्रानला औषधांच्या बाटल्या पुरविण्याची व्यवस्था केल्याचे स्पष्ट होताच, पथकाने   मंगळवारी भिवंडी-वाडा येथे सापळा रचून कारवाई केली. एनसीबीच्या कारवाईने गिरधर चातुरी, इम्रान आणि अंकील पसार झाले. एनसीबीने ठाणे पोलिसांच्या मदतीने चातुरी याला ताब्यात घेतले. 

अधिक तपास सुरू

गिरधर चातुरी याने दिलेल्या माहितीनुसार एनसीबीने इम्रान आणि अंकील यांना अटक केली आहे. त्यानंतर अंकीलच्या वडिलांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महाराष्ट्रासह गुजरात आणि पंजाबमध्ये रॅकेट सुरू असल्याचे तपासात स्पष्ट झाले. याबाबत त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.