Join us  

 महाराष्ट्रातील ४५ खासदार आगामी लोकसभा निवडणुकीत महाविजयाचे बिगुल वाजवतील - बावनकुळे  

By मनोहर कुंभेजकर | Published: January 05, 2024 7:19 PM

महाराष्ट्रातील ४५ खासदार आगामी लोकसभा निवडणुकीत महाविजयाचे बिगुल वाजवतील असा ठाम विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोरीवलीत व्यक्त केला.

मुंबई: महाराष्ट्रातील ४५ खासदार आगामी लोकसभा निवडणुकीत महाविजयाचे बिगुल वाजवतील असा ठाम विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोरीवलीत व्यक्त केला. उत्तर मुंबई हा भाजपाचा बालेकिल्ला असून आगामी काळात येथील खासदार व सर्व आमदारांनी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या विकासकामांचा लेखाजोखा आणि तपशील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी उत्तर मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांची आहे. बूथ स्तरावर, बूथ प्रमुख हा पक्षाचा पाया असून बूथ जिंकला तर  निवडणूक जिंकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चंद्रशेखर बावनकुळे यांचा लोकसभा महाविजय 2024 च्या तयारीच्या दृष्टीने दौरा काल सायंकाळी 5 ते रात्री 10 यावेळेत आणि आज सकाळी बोरीवली (पक्षिम),मधुरम पार्टी हॉल, गोखले शाळेजवळ शिंपोली रोड येथे काल दहिसर, बोरीवली, कांदिवली (पू.) या 3 विधानसभेच्या आणि आज सकाळी मागाठाणे,चारकोप आणि मालाड या 3 विधानसभेच्या दोन टप्प्यात सुपर वाँरीयर्सचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. सुपर वॉरियर संवाद बैठक दि,4 जानेवारी संध्याकाळी आणि आज दि,5 जानेवारी रोजी सकाळी दोन टप्प्यात झाली. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आ.अतुल भातखळकर, आ.योगेश सागर, आ.मनिषा चौधरी, आ.सुनील राणे, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, भाजप सर्व माजी नगरसेवक, व ३०१ बुथ वॉरियर्स उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी हा केडर बेस पक्ष आहे. कार्यकर्ते आणि मजबूत बूथ लेव्हलच्या जोरावर निवडणुकीत चमत्कार घडवून विजय संपादन केला आहे.प्रत्येक जबाबदार कार्यकर्त्याकडे तीन बूथची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.यावेळी तीन बूथवर नियुक्त केलेल्या प्रत्येक योद्ध्याला (बूथ वॉरियर्स) एक विशिष्ट योजनाही देण्यात आली असून, जी प्रत्येक निवडणुकीत निर्णायक ठरेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष अँड.आशिष शेलार यांनी उत्तर मुंबईच्या आमदारांच्या कार्याचे कौतुक केले.तर उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांची विकासकामे अतुलनीय आहेत असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी खा. गोपाळ शेट्टी यांनी  चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत केले.जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांनी आभार व्यक्त केले.मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी श्री राम मंदिर उभारणी व प्राणप्रतिष्ठा महोत्सवाबाबत महत्वाची माहिती दिली. उत्तर मुंबई भाजप सरचिटणीस बाबा सिंग यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.  

टॅग्स :मुंबईभाजपाचंद्रशेखर बावनकुळे