मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सत्तास्थापनेवरुन युतीत सध्या जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेने सत्तास्थानांचे समान वाटप आणि मुख्यमंत्री पदाचा दावा करत भाजपावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. त्यातच शिवसेनेचे 56 पैकी 45 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे विधान भाजपाचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी एका मराठी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाला १०५ जागांवर समाधान मानावे लागले. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. शिवसेनेच्या जागा कमी झाल्या असल्या तरी भाजपाला निर्णायक यश न मिळाल्याने शिवसेनेच्या हाती सत्तेच्या चाव्या लागल्या आहेत. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे शिवसेना व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. मात्र आधी फार्म्युला नंतर सत्तास्थापना अशी भूमिका शिवसेनेने घेतली असून अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी सुधा केली आहे. अन्यथा दुसरा पर्याय असल्याचा सूचक इशारा शिवसेनेच्या नेत्यांनी दिला आहे.
विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधी पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारावेळी सुद्धा शिवसेनेच्या आमदारांचा एक गट मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचे पाहायला मिळाला होता. त्यामुळे शिवसेनेने जर अधिकच दबाव भाजपवर आणला तर या आमदारांचा एक गट बाहेर पडून भाजपला पाठिंबा देऊ शकतो.