मुंबई : शिवसेनेचे 56 पैकी 45 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे विधान भाजपाचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली होती. मात्र संजय काकडेच माझ्या संपर्कात नसल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी विविध गोष्टींचा खुलासा केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सत्तास्थापनेवरुन युतीत सध्या जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेने सत्तास्थानांचे समान वाटप आणि मुख्यमंत्री पदाचा दावा करत भाजपावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. त्यातच शिवसेनेचे 56 पैकी 45 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे विधान भाजपाचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी एका मराठी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.
मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही समझौता होणार नाही- देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, उद्या होणाऱ्या बैठकीत विधिमंडळाचा नेता कोण यावर शिक्कामोर्तब होईल, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पुढील पाच वर्षांसाठी आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचं सांगितलं. 1995चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेले नाही. शिवसेनेने अजून काहीही मागणी केलेली नाही. मीडियाला सरकार स्थापनेबाबत सरप्राईज देणार असल्याचंही फडणवीस म्हणाले आहेत. आतमध्ये काय आहे हे तुम्हाला माहीत नाही. पण लवकरच फॉर्म्युला कळेल. आमचा ‘ए’ प्लॅनच आहे, बी प्लॅन नाही, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाला १०५ जागांवर समाधान मानावे लागले. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. शिवसेनेच्या जागा कमी झाल्या असल्या तरी भाजपाला निर्णायक यश न मिळाल्याने शिवसेनेच्या हाती सत्तेच्या चाव्या लागल्या आहेत. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे शिवसेना व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. मात्र आधी फार्म्युला नंतर सत्तास्थापना अशी भूमिका शिवसेनेने घेतली असून अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी सुधा केली आहे. अन्यथा दुसरा पर्याय असल्याचा सूचक इशारा शिवसेनेच्या नेत्यांनी दिला आहे.