वर्सोवा बीचवरील ४५ ट्रक कचरा काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 06:08 AM2017-11-25T06:08:24+5:302017-11-25T06:08:41+5:30
मुंबई : गेल्या रविवारपासून वर्सोवा बीच स्वच्छता मोहीम बंद करण्याचा निर्णय मोहिमेचे जनक अफरोझ शहा यांनी घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी, शहा यांच्याबरोबर बैठक घेऊन मोहीम सुरू करण्याची विनंती केली होती.
मुंबई : गेल्या रविवारपासून वर्सोवा बीच स्वच्छता मोहीम बंद करण्याचा निर्णय मोहिमेचे जनक अफरोझ शहा यांनी घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी, शहा यांच्याबरोबर बैठक घेऊन मोहीम सुरू करण्याची विनंती केली होती. मात्र, जोवर येथे साचणारा कचरा काढण्याबाबत धोरण ठरत नाही, तोवर येथील स्वच्छता मोहीम सुरू करणार नाही, असा पवित्रा घेतल्याचे अफरोझ यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
शुक्रवारी सकाळी के-पश्चिम विभागाचे सहायक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्यासोबत अफरोझ यांची एक तास चर्चा झाली. गेल्या सोमवारपासून येथील ६० टक्के कचरा काढण्यात आल्याची माहिती बैठकीदरम्यान त्यांना देण्यात आली. समुद्रात रोज जमा होणारा कचरा, प्लॅस्टिक, मलमूत्र, कारखान्यातून समुद्रात टाकण्यात येणारे रासायनिक पदार्थ, यांना आळा घालण्यासाठी आणि समुद्र सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी सागरी स्वच्छता धोरण, राज्य सरकारने कार्यान्वित करण्याची मागणी आपण केल्याचे अफरोझ यांनी सांगितले.
दरम्यान, वर्सोवा बीचवर जमा झालेला शंभर ट्रक कचरा उचलत नसलेल्या के-पश्चिम विभागाने, गेल्या पाच दिवसांत सुमारे ४५ ट्रक कचरा उचलला आहे.