मुंबईत म्युकरमायकोसिसचे ४५७ रुग्ण उपचाराधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:06 AM2021-06-16T04:06:55+5:302021-06-16T04:06:55+5:30
मुंबई : मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्णही कमी होत आहेत. मुंबईत सध्या म्युकरमायकोसिसचे ४५७ रुग्ण उपचाराधीन ...
मुंबई : मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्णही कमी होत आहेत. मुंबईत सध्या म्युकरमायकोसिसचे ४५७ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
मागील कोरोना लाटेच्या तुलनेत या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, या आजाराचे लवकर निदान झाल्यास उपचार करणे सुलभ होते. मात्र, सध्या उशिरा निदानामुळे बऱ्याच रुग्णांसाठी हा आजार जीवघेणा ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यातून अनेकांच्या चेहऱ्याच्या, नाकाच्या, टाळूच्या, मेंदूच्या आणि सर्वात महत्त्वाच्या डोळ्याच्या शस्त्रक्रिया कराव्या लागत आहेत. उपचार न होण्यामागे रुग्ण उशिरा दाखल होणे हेही एक कारण आहे. मुंबईत सर्वाधिक म्हणजे सुमारे २५ टक्के रुग्ण केईएममध्ये दाखल आहेत. राज्यात सुमारे सात हजार म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले. त्यापैकी ६०० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात या आजाराचा मृत्युदर आठ टक्क्यांवर गेला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
केईएम रुग्णालयात एकचतुर्थांश रुग्ण दाखल असून, ही संख्या १११ एवढी आहे. तर, याचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येत २८ टक्के आहे. संपूर्ण मुंबईत आतापर्यंत ७८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील २५ मृत्यू हे मुंबईतील आणि ५३ मृत्यू हे मुंबईबाहेरून उपचारांसाठी आलेल्या रुग्णांचे आहेत.
नऊ जणांच्या शस्त्रक्रिया
केईएम रुग्णालयात आतापर्यंत ९१ रुग्णांच्या तीन प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. जवळपास ३१ रुग्णांच्या डोळ्यांमागे ॲम्फोटेरिसिन हे इंजेक्शन दिले गेले आहे. ६१ रुग्णांवर कान-नाक-घसा या शस्त्रक्रिया झाल्या असून, म्युकरचा भाग काढला आहे. ०४ न्यूरो सर्जरी केल्या गेल्या आहेत, तर नऊ जणांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत.
सायनमध्ये ११ जणांनी डोळे गमाविले
कोरोनापूर्वी वर्षाला केवळ आठ रुग्णांना या संसर्गाची लागण होत असल्याचे निरीक्षण होते. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत एकूण ६५ म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार केले गेले. त्यातील ४२ रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या गेल्या. त्यातील ११ रुग्णांना म्युकरमायकोसिसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याने त्यांच्यावर डोळ्यांची शस्त्रक्रिया केली गेली, तर दोन रुग्णांचे दोन्ही डोळे काढावे लागले.
३० टक्के रुग्णांमध्ये मेंदूपर्यंत पोहोचते बुरशी
ही बुरशी झपाट्याने तर वाढतेच; परंतु नाक, सायनस, डोळ्यांमध्ये, डोळ्यांच्या मागे, मेंदूमध्ये, गालाच्या हाडाच्या मागून शरीरात कोपऱ्याकोपऱ्यांमध्ये पोहोचते. एका मर्यादेनंतर तेथून तिला काढणे शक्यच होत नाही. शस्त्रक्रिया हा यावरील उपचार नाही. शस्त्रक्रियेने त्या त्या भागातील बुरशी काढून टाकली जाते. कोरोना झाल्यानंतर रुग्णाची प्रतिकारकशक्ती कमी होते. म्युकरच्या रुग्णांमध्ये साखरेची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने शरीरातील अनेक प्रक्रियांवर परिणाम झालेला असतो. त्यामुळे सर्व रुग्णांना भूल देता येत नाही. जवळपास ३० टक्के रुग्णांमध्ये मेंदूपर्यंत ही बुरशी पोहोचली असून, ज्यांच्यावर आता कोणतेही उपचार करणे शक्य नाही; परंतु रुग्णांना, नातेवाइकांना हे किती वेळा समजावले तरी त्यांना वाटते की, शस्त्रक्रिया केली की बरे होईल, म्हणून मग ते उपचार करा असे विनवणी करत राहतात. अशा रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना कसे समजावावे, असा प्रश्न आमच्यापुढे निर्माण झाला आहे, असे केईएमच्या कान, नाक, घसा विभागाच्या प्रमुख डॉ. हेतल मारफतिया यांनी सांगितले.
लक्षणे काय आहेत?
म्युकरमायकोसिस हा आजार सायनस म्हणजेच नासिकेच्या आतल्या हाडात, नाक, दात आणि त्यानंतर डोळ्यांकडे पसरतो. नंतरच्या पातळीत हा संसर्ग फुप्फुसे आणि मेंदूपर्यंतही पसरू शकतो. या संसर्गामुळे चेहरा आणि नाकावर काळे डाग पडतात किंवा तिथल्या त्वचेचा रंग बदलतो. दृष्टी अधू होते, छातीत दुखू लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे आणि खोकल्यातून रक्त पडणे इत्यादी लक्षणे जाणवू शकतात. मात्र, नाक चोंदणाऱ्या सगळ्याच रुग्णांनी जीवाणू जुन्या सायनसिटीस झाला असावा, असे गृहीत धरू नये, असा सल्ला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिला आहे. विशेषतः कोविड रुग्णांवर उपचार सुरू असताना किंवा झाल्यावर हे लक्षात घ्यावे. हा बुरशीसंसर्ग आहे का हे जाणून घेण्यासाठी, वैद्यकीय तपासणी आणि सल्ला घेणे उचित ठरेल.
काय काळजी घ्याल
मधुमेह नियंत्रणात असेल तर हा आजार होण्याची शक्यता केवळ एक टक्का असते. तोंड, नाक, दात स्वच्छ ठेवावेत. रुग्णाला ऑक्सिजन देताना डिस्टिल्ड पाणी वापरावे. ते बदलत रहावे. स्टेरॉइडचा वापर योग्य प्रमाणातच करावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवावी. ती वाढणार नाही याची काळजी घ्यावी. रुग्णावर स्टेरॉइडचा अधिक वापर झाल्यास प्रतिकारशक्ती वेगाने कमी होते. त्यामुळे स्टेरॉइडचा वापर योग्य प्रमाणातच व्हावा. तोंड, नाक, दातांसह शरीराची नियमित स्वच्छता ठेवावी. कृत्रिम ऑक्सिजन पुरवठा करताना कटाक्षाने डिस्टिल्ड वॉटरचाच वापर करावा. नियमित योगा, व्यायाम, चौरस आहाराने रोगप्रतिकारशक्ती वाढवावी, पुरेशी विश्रांती घ्यावी.