46 टक्के मुंबईकर ‘वजन’दार; महिलांमध्ये वाढतोय लठ्ठपणा, सर्वेक्षणातील सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 06:43 AM2023-11-14T06:43:29+5:302023-11-14T06:43:44+5:30
विशेष म्हणजे लठ्ठपणा महिलांमध्ये जास्त आढळला आहे.
मुंबई : जागतिक आरोग्य संघटना व मुंबई महापालिका यांनी संयुक्तपणे दोन वर्षांपूर्वी केलेल्या स्टेप्स (विविध पातळ्यांवर) सर्वेक्षणानुसार, शहरातील सुमारे ४६ टक्के नागरिकांचे वजन सरासरीपेक्षा अधिक तर १२ टक्के मुंबईकर लठ्ठ असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे लठ्ठपणा महिलांमध्ये जास्त आढळला आहे.
महापालिका दवाखाना व आपला दवाखाना येथे प्रत्येक महिन्यात ६० ते ७० हजार नागरिकांची मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात येते आणि सुमारे ५० हजार रुग्ण नियमितपणे मधुमेहासंदर्भातील उपचार घेत आहेत. ३० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीची चाचणी करण्याच्या दृष्टीने महापालिकेने आपल्या २६ रुग्णालयांमध्ये ऑगस्ट, २०२२ पासून मधुमेह व उच्चरक्तदाब तपासणी केंद्र सुरू केले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत २ लाख ५४ हजार व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
तपासणी केलेल्या व्यक्तीपैकी १२ टक्के व्यक्तीमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण १४० मिलिग्रॅमपेक्षा अधिक आहे. या सर्व व्यक्तीना संपर्क साधून, पाठपुरावा करून, त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.जानेवारीपासून लोकसंख्या आधारित आरोग्य चाचणी सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत अंदाजे १३ लाख व्यक्तीची तपासणी करण्यात आली असून १२ हजार व्यक्तीना उच्चरक्तदाब असल्याचे आढळून आले आहे.
मधुमेह असलेल्या व्यक्तीपैकी किमान ५० टक्के नागरिकांना आपल्याला मधुमेह झाला आहे, हे निदान होईपर्यंत प्रत्यक्षात ठाऊकच नसते. त्यामुळे आरोग्य विषयक गुंतागुंत टाळण्यासाठी जागरूक राहून नियमितपणे रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून घेणे, हे अत्यंत गरजेचे आहे. - डॉ. दक्षा शाह, कार्यकारी आरोग्य अधिकारी