मुंबई : जागतिक आरोग्य संघटना व मुंबई महानगरपालिका यांनी संयुक्तपणे मुंबईमध्ये सन २०२१ मध्ये केलेल्या स्टेप्स ( विविध पातळ्यांवर ) सर्वेक्षणानुसार, शहरातील सुमारे ४६% नागरिकांचे वजन हे सरासरीपेक्षा अधिक आहे. तर १२% मुंबईकर लठ्ठ असल्याचे आढळले. विशेष म्हणजे लठ्ठपणा महिलांमध्ये जास्त आढळला आहे. लठ्ठ आणि बैठे काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये टाइप २ मधुमेहाचा धोका अधिक असतो व सामान्यतः ३५ वर्षे किंवा त्याहून अधिक व्यक्तींना प्रभावित करतो.
महापालिका दवाखाना व आपला दवाखाना येथे प्रत्येक महिन्यात ६० ते ७० हजार नागरिकांची मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात येते आणि सुमारे ५० हजार रुग्ण नियमितपणे मधुमेहा संदर्भातील उपचार घेत आहेत. ३० वर्षे पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींची चाचणी करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने आपल्या २६ रुग्णालयांमध्ये ऑगस्ट २०२२ पासून मधुमेह व उच्चरक्तदाब तपासणी केंद्र सुरु केले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून ऑगस्ट २०२२ पासून आतापर्यंत २ लाख ५४ हजार व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तपासणी केलेल्या व्यक्तींपैकी १२% व्यक्तिमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण १४० मिलिग्रॅम पेक्षा अधिक आहे. या सर्व व्यक्तींना संपर्क साधून, पाठपुरावा करून, त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
१३ लाख व्यक्तींची तपासणी, १२ हजार व्यक्तीना उच्चरक्तदाब
जानेवारी २०२३ पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये, झोपडपट्टी आणि तत्सम वस्तींमध्ये, आरोग्य स्वयंसेविका / आशा सेविका यांच्या मार्फत लोकसंख्या आधारित आरोग्य चाचणी सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने ३० वर्षे वयावरील व्यक्तींची उच्च रक्तदाब आणि असंसर्गजन्य आजार विषयक धोके जाणून घेण्यात येत आहेत. आतापर्यंत अंदाजे १३ लाख व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे त्यातील १२ हजार व्यक्तीना उच्चरक्तदाब असल्याचे आढळून आले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नागरिकांसाठी जनजागृती करण्याकरिता विविध उपक्रम:- येत्या १४ नोव्हेंबर २०२३ जागतिक मधुमेह दिना निमित्ताने मुंबईतील उद्यानामध्ये मोबाईल व्हॅन, रेल्वे स्थानक, सामान्य सुविधा केंद्र, मॉल्स मध्ये मधुमेह व उच्च रक्तदाब शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जाहिरात फलक (होर्डिंग), बॅनर, रेडिओ जिंगल द्वारे सामाजिक माध्यमातून नागरिकांसाठी जनजागृती करण्यात येणार आहे.
मधुमेह असलेल्या व्यक्तींपैकी किमान ५० टक्के नागरिकांना आपल्याला मधुमेह झाला आहे, हे निदान होईपर्यंत प्रत्यक्षात ठाऊकच नसते. त्यामुळे आरोग्य विषयक गुंतागुंत टाळण्यासाठी जागरूक राहून नियमितपणे रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून घेणे, हे अत्यंत गरजेचे आहे. - डॉ दक्षा शाह, कार्यकारी आरोग्य अधिकारी
सर्वेक्षणात काय आढळून आले ? १८ ते ६९ वर्ष या वयोगटातील सुमारे १८ % व्यक्तींमध्ये उपाशीपोटी असताना रक्तातील साखरेचे प्रमाण १२६ मिलिग्रॅम पेक्षा अधिकप्री-डायबेटिसची टक्केवारी १५.६% आहे ८.३% व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह या दोन्ही आजार आढळले.