Join us  

सहा महिन्यांत खरेदी केली ४६ हजार घरे! सात शहरांत पहिला क्रमांक मुंबईचा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 6:18 AM

दिल्लीलाही टाकले मागे

मुंबई : परवडणाऱ्या घरांची निर्मिती आणि विक्रीत महामुंबई व पुणे परिसराने बाजी मारल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनारॉक कंपनीने या संदर्भात एक सर्वेक्षण प्रसिद्ध केले असून देशातील सात शहरांच्या तुलनेत महामुंबई व पुणे परिसर वगळता अन्य ठिकाणी मात्र परवडणाऱ्या दरातील घरांची संख्या रोडावताना दिसत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, २०२३ या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता या शहरांत एकूण २ लाख २९ हजार घरांची विक्री झाली. यापैकी २० टक्के अर्थात ४६ हजार ५५० घरे ही परडवणाऱ्या श्रेणीतील आहेत. यापैकी महामुंबई परिसरात एकूण १७ हजार ४२० परवडणाऱ्या दरातील घरांची विक्री झाली, तर पुणे परिसरात एकूण ९,७०० परवडणाऱ्या दरातील घरांची विक्री झाल्याची माहिती आहे.

२०२३ च्या पहिल्या सहा महिन्यांत या सात प्रमुख शहरांतून ज्या घरांची विक्री झाली त्याचा आकडा २०२२ मधील याच कालावधीच्या तुलनेत २० टक्क्यांनी घसरला आहे. २०२२ च्या पहिल्या सहामाहीमध्ये सात प्रमुख शहरांतून एक लाख ८४ हजार घरांची विक्री झाली होती. यापैकी परवडणाऱ्या दरातील घरांची संख्या  ही ५७ हजार ६० इतकी होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा घरांची विक्री जास्त झाली असली तरी विकासकांनी परवडणाऱ्या दरातील घरांची निर्मिती कमी दिसून येते.

जमीनच जर महागड्या दरात उपलब्ध झाली, तर स्वाभाविकपणे घरांच्या किमती वाढतात असा बिल्डर मंडळींचा पवित्रा आहे. त्यामुळे जर उत्तम पायाभूत सुविधांसह उपनगरे विकसित झाली, तर त्याद्वारे अधिक परवडणाऱ्या दरातील घरांची निर्मिती करता येईल, असा सूर आहे.

टॅग्स :मुंबई