४६० रिक्षा-टॅक्सीचालकांचे वाहन परवाने महिनाभरात रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 03:02 AM2019-03-28T03:02:09+5:302019-03-28T03:02:24+5:30
मुंबईतील मुजोर रिक्षा व टॅक्सींविरोधात आरटीओने सुरू केलेल्या धडक मोहिमेत पहिल्याच महिन्यात ४६० चालकांचे परवाने रद्द करण्यात आले. त्यातील ३००हून अधिक चालकांचे परवाने सुनावणीअंती कायमस्वरूपी रद्द केले आहेत.
मुंबई : मुंबईतील मुजोर रिक्षा व टॅक्सींविरोधात आरटीओने सुरू केलेल्या धडक मोहिमेत पहिल्याच महिन्यात ४६० चालकांचे परवाने रद्द करण्यात आले. त्यातील ३००हून अधिक चालकांचे परवाने सुनावणीअंती कायमस्वरूपी रद्द केले आहेत. याशिवाय रिक्षा व टॅक्सी चालकांकडे वाहन परवाना किंवा वाहन चालक बिल्ला नसल्याने, एक हजाराहून अधिक रिक्षा व टॅक्सींचे परमिट एक ते तीन महिन्यांसाठी रद्द केल्याची माहिती आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कुर्ल्यासह वांद्रे पूर्व आणि पश्चिम परिसरात सुरू झालेली ही मोहीम आता मुंबई शहर आणि उपनगरात राबविण्यात येणार आहे. महिन्याभरात झालेल्या कारवाईत एकूण २ हजार ४६८ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात भाडे नाकारल्यामुळे ४६० रिक्षा व टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. या चालकांविरोधात तूर्तास सुनावणी सुरू असून, दोषी आढळलेल्या ३००हून अधिक चालकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाने सांगितले.
भाडे नाकारण्यासह जादा भाडे मागणाऱ्या २०, तर जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या १८१ चालकांविरोधात परिवहन विभागाने कारवाई केली आहे. दरम्यान, परिवहन विभागाने इतर नियमांची कडक अंमलबजावणी होतेय का? याची पाहणी सुरू केली आहे. त्यात रिक्षा व टॅक्सी चालकाचा गणवेश, बिल्ला, वाहन चालक परवाना धारण केला आहे का? याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत १ हजार ४६६ वाहनांचे परमिट एक ते तीन महिन्यासाठी रद्द करण्यात आले आहे.
रिक्षा, टॅक्सीविरोधात तक्रारींत वाढ
प्रादेशिक परिवहन विभागाच्या ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि बोरीवली अशा चार कार्यालयांत १ एप्रिल, २०१७ ते ३१ मार्च, २०१८ या कालावधीत भाडे नाकारणे, उद्धट वर्तन, जादा प्रवासी, मीटर सील ब्रोकन, बिल्ला नसणे, विना गणवेश अशा विविध गुन्ह्यांच्या एकूण ३ हजार ९९८ तक्रारी नोंदविण्यात आल्या.
याउलट १ एप्रिल, २०१८ ते ३१ जानेवारी, २०१९ या १० महिन्यांच्या कालावधीतच याच प्रकरणी एकूण ५ हजार ०७१ तक्रारींची नोंद झाली आहे. रिक्षा आणि टॅक्सींविरोधातील तक्रारींत तब्बल २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याची नोंद आहे. याचीच दखल घेत, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ही धडक मोहीम हाती घेतली आहे. मुजोर रिक्षा व टॅक्सी चालकांविरोधात प्रवासी १८००२२०११० या टोल फ्री क्रमांकावर फोन करून तक्रार नोंदविण्याचे आवाहन आरटीओने केले आहे.
१,१५० परवाने जप्त
प्रवाशांच्या तक्रारीवरून आरटीओने केलेल्या कारवाईत एकूण १ हजार १५० वाहन चालकांचे वाहन परवाने जप्त केले आहेत. यासह १२४ रिक्षांवरही जप्तीची कारवाई करण्यात आली. वांद्रे आणि कुर्ला परिसरातील या कारवाईनंतर आरटीओने आपला मोर्चा मुंबईभर वळविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील मुजोर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना चाप लावण्यासाठी ही कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे आरटीओने सांगितले.