मुंबई : बांधकामांच्या ठिकाणी स्प्रिंकलर, स्मॉग गन यांसह विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यासाठी पालिकेने बिल्डरांना १५ दिवसांची मुदत दिली असतानाच पालिकेच्या विशेष पथकांनी ८१५ बांधकामांच्या ठिकाणांची पाहणी केली. त्यातील ४६१ बांधकामांना त्वरित नियमांची अंमलबजावणी न केल्यास काम थांबवण्याची नोटीस अथवा बांधकामाचे ठिकाणच सील करण्याचा इशारा दिला.
स्थानिक पातळीवर इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पातून धुळीचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे बांधकामांच्या जागी पत्र्यांचे आच्छादन, कापडी, ताडपत्र्यांची आवरणे बसवण्यास पालिकेने सूचना दिल्या आहेत. बांधकामांच्या ठिकाणचा राडारोडा हटवावा, धूळ उडू नये यासाठी पाण्याची फवारणी, ट्रक किंवा इतर वाहनांना धूळ चिकटून हवेत पसरू नये यासाठी वाहनांची चाके पाण्याने स्वच्छ करणे यासह पालिकेने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी बांधकामांना लेखी सूचना दिली आहे. उपाययोजनांसाठी महिनाभराचा कालावधी असल्याने अद्याप बांधकाम थांबविण्याची नोटीस कुणालाही जारी केली नाही.
मुंबईतील हवेची ढासळलेली गुणवत्ता, बांधकामांची धूळ, वाहनांचे प्रदूषण या सर्व कारणांमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व बांधकाम व्यावसायिक व कंत्राटदारांनी स्प्रिंकलर आणि स्मॉग गन घेईपर्यंत मूलभूत प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
५५ किमी. लांबीच्या क्षेत्रात पाणी फवारणीमुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी आणि विविध रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी शनिवारी पालिकेच्या स्लज डिवॉटरींग (१७), फायरेक्स टँकर (७), सूक्ष्मजल फवारणी यंत्र (५) मीस्ट ब्लोइंग यांच्या साहाय्याने पाण्याची फवारणी केली आहे. ५५ किमी क्षेत्रात शनिवारी पाणी फवारणी केल्याची माहिती पालिकेने दिली. फवारणीची वारंवारता वाढविणार असल्याचे उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांनी सांगितले.