वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी लाईफलाईनउडान अंतर्गत २७४ विमानांद्वारे ४६३ टन मालवाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 06:14 PM2020-04-18T18:14:26+5:302020-04-18T18:15:09+5:30
कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये देशाच्या दुर्गम भागात वैद्यकीय उपकरणे, औषधे व इतर आवश्यक सामग्री पोचवण्यासाठी विमान वाहतुकीचा मोठा वापर केला जात आहे.
मुंबई : कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये देशाच्या दुर्गम भागात वैद्यकीय उपकरणे, औषधे व इतर आवश्यक सामग्री पोचवण्यासाठी विमान वाहतुकीचा मोठा वापर केला जात आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाद्वारे लाईफलाईन उडान विमानांद्वारे ही मालवाहतूक केली जात आहे. एअर इंडिया, अलायन्स एअर, भारतीय हवाई दल आणि खाजगी विमान कंपन्यांमार्फत लाईफलाईन उडान अंतर्गत 274 विमाने चालविली गेली. त्यापैकी 175 उड्डाणे एअर इंडिया आणि अलायन्स एअरने चालविली आहेत. आजपर्यंत या विमानांद्वारे 463.15 टन मालवाहतूक करण्यात आली आहे. आजपर्यंत लाईफलाईन उडान विमानांनी 2 लाख 73 हजार 275 किमी पेक्षा जास्त हवाई अंतर पार केले आहे.
जम्मू-काश्मीर, लडाख,बेटे आणि ईशान्य भागात महत्त्वाचे वैद्यकीय साहित्य आणि गंभीर रूग्णांची ने-आण करण्यासाठी पवनहंसव इतर हेलिकॉप्टर सेवेची मदत घेतली जात आहे. देशांतर्गत ‘लाईफलाईन उडान’ विमानांसाठी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता,हैदराबाद, बेंगळुरू आणि गुवाहाटी येथे मालवाहतूक हब स्थापित केले गेले आहेत. लाईफलाईन उडान विमाने या मालवाहतूक केंद्रांनादिब्रूगड, अगरतला, ऐझवाल, दिमापूर,इंफाळ, जोरहाट, लेंगपुई, म्हैसूर, नागपूर, कोईमतूर,त्रिवेंद्रम,भुवनेश्वर, रायपूर, रांची, श्रीनगर, पोर्टब्लेअर, पटना, कोचीन,विजयवाडा, अहमदाबादजम्मू, कारगिल, लडाख, चंदीगड,गोवा, भोपाळ आणि पुणे येथील विमानतळांशी जोडतात. ईशान्य प्रदेश, बेट प्रदेश आणि डोंगराळ राज्य यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. एअर इंडिया आणि आयएएफने प्रामुख्याने जम्मू-काश्मीर, लडाख, ईशान्य आणि इतर बेट प्रांतासाठी सहकार्य केले आहे.
आंतरराष्ट्रीय मार्गावर फार्मास्युटिकल्स, वैद्यकीय उपकरणे आणि कोविड -19 मदत साहित्याच्या वाहतुकीसाठी 4 एप्रिल पासून एक हवाई पूल स्थापन करण्यात आला आहे. कृषी उडान कार्यक्रमांतर्गत एअर इंडियाने 15 एप्रिल रोजी मुंबई आणि फ्रॅंकफर्ट दरम्यान दुसऱ्यांदा उड्डाण केले आणि 27 टन हंगामी फळे आणि भाज्या फ्रॅंकफर्टला पोहोचविल्या आणि परत येताना 10 टन सर्वसाधारण माल आणला. कृषी उडान कार्यक्रमांतर्गत एअर इंडियाने पहिल्यांदा 13 एप्रिल रोजी मुंबई आणि लंडन दरम्यान उड्डाण केले होते. तेव्हा 28.95 टन फळे आणि भाज्या लंडनला नेल्या होत्या आणि परत येताना 15.6 टन सर्वसामान्य माल आणला होता. आवश्यकतेनुसार एर इंडिया गंभीर वैद्यकीय पुरवठ्यांच्या हस्तांतरणासाठी इतर देशांमध्ये मालवाहू उड्डाणे करणार आहे. एअर इंडियाने 15 एप्रिल रोजी दिल्ली-सेशेल्स-मॉरिशस-दिल्ली दरम्यान अशाप्रकारचे प्रथम उड्डाण केले. सेशेल्सला 4.4 टन आणि मॉरीशसला 12.6 टन वैद्यकीय साहित्य आणि सामुग्रीचा पुरवठा करण्यात आला.