विधि शाखेचे निकाल जाहीर, सेमिस्टर पाचमध्ये ४६.३५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 06:02 AM2018-08-05T06:02:37+5:302018-08-05T06:02:55+5:30
रखडलेल्या निकालांमुळे तणावात असलेल्या विधि शाखेच्या विद्यार्थ्यांना अखेर मुंबई विद्यापीठाने दिलासा दिला आहे.
मुंबई : रखडलेल्या निकालांमुळे तणावात असलेल्या विधि शाखेच्या विद्यार्थ्यांना अखेर मुंबई विद्यापीठाने दिलासा दिला आहे. गेल्या दोन दिवसांत विधि शाखेचे अनेक निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यात महत्त्वपूर्ण अशा सेमिस्टर पाच आणि सहाच्या निकालांचाही समावेश आहे. सेमिस्टर पाचचा निकाल ४६.३५ टक्के तर सेमिस्टर सहाचा निकाल ६७.४० टक्के लागला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाने जाहीर केलेल्या निकालानुसार विधि शाखेच्या सेमिस्टर सहाचा निकाल ६७.४० टक्के लागला आहे. या परीक्षेत फक्त ४४ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली असून एक हजार ६३१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहेत. तर, सेमिस्टर पाचमध्ये ४६.३५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षीपासून सरसकट सर्व अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी आॅनलाइन मूल्यांकन सुरू केले. मात्र, या आॅनलाइन मूल्यांकनातील त्रुटीमुळे गेल्या वर्षी विद्यार्थ्यांचे निकाल रखडले होते. याचा सर्वांत जास्त फटका हा मुंबई विद्यापीठातील विधि शाखेच्या विद्यार्थ्यांना बसला होता. निकालासाठी विद्यार्थ्यांना आंदोलनेदेखील करावी लागली होती. त्यामुळे बराच गोंधळ उडाला होता. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या उन्हाळी सत्र परीक्षांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर विधि शाखेचे अनेक महत्त्वपूर्ण निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.