माहुलच्या घरांसाठी ४७ अर्ज; पहिल्याच दिवशी महापालिकेच्या २१ कर्मचाऱ्यांनी भरली अनामत रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 15:15 IST2025-03-18T15:14:38+5:302025-03-18T15:15:17+5:30
चेंबूर- माहुल येथील प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेल्या घरांमध्ये बाधित कुटुंबे राहायला जात नसल्याने रिक्त आहेत. त्यांची पालिकेला देखभाल करावी लागते. १५ एप्रिल अर्ज सादर करण्यासाठी शेवटची मुदत आहे. त्यानंतर लॉटरी काढून घरांचे वितरण केले जाईल.

माहुलच्या घरांसाठी ४७ अर्ज; पहिल्याच दिवशी महापालिकेच्या २१ कर्मचाऱ्यांनी भरली अनामत रक्कम
मुंबई : माहुलमध्ये १३ हजारांवर घरे रिक्त असल्याने महापालिका कर्मचाऱ्यांना साडेबारा लाखांत मालकी तत्त्वावर त्यांची विक्री केली जाणार आहे. ९,०९८ घरांसाठी सोमवारपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ४७ कर्मचाऱ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यातील २१ जणांनी अनामत रक्कम भरल्याची माहिती पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याने दिली.
चेंबूर- माहुल येथील प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेल्या घरांमध्ये बाधित कुटुंबे राहायला जात नसल्याने रिक्त आहेत. त्यांची पालिकेला देखभाल करावी लागते. १५ एप्रिल अर्ज सादर करण्यासाठी शेवटची मुदत आहे. त्यानंतर लॉटरी काढून घरांचे वितरण केले जाईल.
विविध विकास प्रकल्पांमध्ये घरे जाणाऱ्या प्रकल्पबाधितांना मुंबईतील माहुल येथे घरे बांधण्यात आली आहेत. परंतु माहुल येथील रासायनिक प्रकल्पांमधून प्रदूषण होत असल्याने तेथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे येथे पुनर्वसन करण्यासाठी रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे. अनेकांना दमा, टीबी आदी आजारांच्या समस्या निर्माण झाल्याच्या तक्रारी आहेत. प्रकल्पबाधितांनी आंदोलनही केले होते.
अशी असेल प्रक्रिया
ऑनलाइन अर्जास सुरुवात : १५ मार्च
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिवस : १५ एप्रिल
सोडतीसाठी अंतिम यादी प्रसिद्ध करणे : १६ एप्रिल
सदनिकांची पूर्ण रक्कम भरणे : १२ ऑक्टोबर २०२५