Join us

पहिल्या दिवशी मुंबईतून ४७ विमानांची उड्डाणे; ४,८५२ जणांनी घेतला हवाई वाहतूक सेवेचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 3:22 AM

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाने सांगितले की, कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून विमानतळावर अनेक उपाययोजना करण्यात आल्या

मुंबई : मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वरून सोमवारी एकूण ४७ विमानांची वाहतूक झाली. देशभरातील १४ शहरांतून ७ विमान कंपन्यांच्या विमानांनी उड्डाणे केली. त्यात सर्वाधिक ये-जा दिल्ली-मुंबई मार्गावर होती. एकूण ४८५२ प्रवाशांनी प्रवास केला. त्यात ३७५२ प्रवासी विविध शहरात रवाना झाले. तर ११०० प्रवासी मुंबईत आले.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाने सांगितले की, कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून विमानतळावर अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मुंबई पालिकेच्या आदेशानुसार आगमन झालेल्या प्रवाशांच्या हातावर स्टॅम्प मारून त्यांना ७ दिवस होम क्वारंटाईन केले. जे कमी कालावधीसाठी मुंबईत आले आहेत त्यांची माहिती प्रशासनाला देण्यात आली. विलगीकरण कक्ष विमानतळावर उभारला असून तपासणीत एखाद्याला कोरोनाची लक्षणे आढळल्यास या कक्षात त्याची सोय करण्यात येईल.

प्रवाशांना मनस्ताप झाल्याचे पहिल्याच दिवशी समोर आले. सरकारने केवळ ५० विमानांच्या उड्डाणासाठी परवानगी दिली. मात्र केवळ ४७ विमानांनी उड्डाण केले. अंधेरीतील लाज गिरधर म्हणाले की, विमानतळावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विमान रद्द झाल्याची माहिती दिल्याने परतावे लागले. एअर इंडिया विमानाने ११ वाजता जाणाºया प्रवाशाने सांगितले की, सकाळी ५ वाजेपर्यंत विमान आॅनलाइन वेळ दाखवत होते. विमानतळावर गेल्यानंतर मात्र विमान रद्द झाल्याचे कळले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसविमानमुंबई